भाजप आमदार उमा खापरेंनी युरोप दौऱ्यात बांधली राष्ट्रवादी आमदार सुनिल शेळकेंना राखी

0
309

विदेश, दि. १ (पीसीबी) – महाराष्ट्रातील सर्वपक्षीय २२ आमदार हे २४ ऑगस्टला दहा दिवसांच्या युरोपच्या अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. तेथे भाजपच्या पिंपरी-चिंचवडकर आमदार (विधानपरिषद सदस्य) उमा खापरे यांनी नव्याने राज्यातील युतीच्या (भाजप-शिंदे शिवसेना) सरकारात सामील झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे मावळचे (जि. पुणे) आमदार सुनील शेळके यांना प्रवासातच बसमध्ये राखी बांधून रक्षाबंधन सण बुधवारी साजरा केला.

एकमेकांचे विरोधक असलेले भाजप (आठ), कॉंग्रेस (सहा), ठाकरे शिवसेना (एक) शिंदे शिवसेना (दोन), राष्ट्र्वादीचे (पाच) आमदार अभ्यास दौऱ्यासाठी एकत्र गेले आहेत. त्यात निम्या (११) महिला आहेत. युरोपातील महिला सक्षमीकरण, मत्स्य आणि दुग्ध व्यवसायाचा ते अभ्यास करणार आहेत. चिंचवडच्या भाजपच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांच्यासह उद्योगनगरीतीलच खापरे आणि मावळचे शेळके यांच्यासह विधानपरिषदेच्या उपसभापती पुण्यातील डॉ नीलम गोऱ्हे ( शिंदे शिवसेना ), शिरूरचे अशोक पवार (राष्ट्रवादी) आणि भोरचे संग्राम थोपटे (कॉंग्रेस) आदी युरोपमधील जर्मनी, नेदरलॅण्ड आणि इंग्लड या देशांच्या दौऱ्यात सहभागी झाले आहेत.