भाजप आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे विकृतीकरण

0
265

नागपूर, दि. १६ (पीसीबी) : दिल्लीसमोर महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा अपमान करून सत्तेचे लालूंगचालन करण्याचं पाप आजवर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी केले नव्हते, ते परवा परवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे विकृतीकरण करण्याचा आरएसएसचा डाव, असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी केला आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्तीचे भाषण टाळून राज्याचा अपमान करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर केले आहे. परंतु महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. आणि वैयक्तिक पातळीवर उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणापेक्षा उत्तम शासनावर भर देत आले आहे. त्यामुळे भाजपच्या या अवहेलनेने त्यांच्या कार्यशैलीत बदल होणार नाही. परंतु महाराष्ट्र या गोष्टीची नोंद कायम ठेवेल आणि भाजपला त्याचे उत्तर योग्य वेळी दिले जाईल, असेही कुंटे पाटील म्हणाले.

अजित पवार एक व्यक्ती नसून राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. हे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे सोयीस्करपणे विसरले असल्याचा आरोपही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांचे भाषणं कुठल्या प्रोटोकॉलमध्ये झाले, असा सवाल करीत राजशिष्टाचार पाळणे हे आमच्या संस्कारात असल्याने अजितदादा गप्प बसले आहेत. नाहीतर आम्हाला पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे प्रमाणे पंतप्रधानांच्या समक्ष बहिर्गमन करता आले असते. अजितदादांचा अपमान हा महाराष्ट्र राज्याचा अपमान असून ज्या पद्धतीने देहू संस्थानच्या कार्यक्रमाचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न भाजप व त्यांच्या नेत्यांनी केला त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असेही कुंटे पाटील म्हणाले.