मुंबई, दि. २३ (पीसीबी) : राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. त्यामुळे पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला बाहेर घालवण्यासाठी भाजप-शिंदे गट सरसावल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. आता ते अजित पवार यांचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंधे गटाचा काटा काढतील, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवारांना महायुतीतून काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी मोठे विधान केले. “भाजप आणि मिंधे गट एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी आहेत. गरज सरो, वैद्य मरो, अशी भाजपची भूमिका असल्याने अजित पवार यांना अडचणीत आणणारी विधाने मिंधे गट आणि भाजपकडून करण्यात येत आहेत”, असा दावाही संजय राऊतांनी केला
“भाजप आणि मिंधे गट एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी आहेत. भाजपवर कोणीही विश्वास ठेऊ नये, ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा काढतात. आता ते अजित पवार यांचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंधे गटाचा काटा काढतील. ते मिंधे गटाची गर्दन उडवतील, ते अत्यंत निर्दयी आहेत. याचा अनुभव आमच्यासह भाजपच्या देशातील अनेक मित्रपक्षांनी घेतला आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
“अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झाला आहे. त्याला मिंधे गटातील काही जणांचा पाठिंबा आहे. अजित पवार यांना दूर केले, तर विधानसभेसाठी जास्तीतजास्त जागा लढण्यासाठी मिळवण्याचा त्यांचा डाव आहे. अजित पवार शरद पवारांशी बेइमानी करत मोठा धोका पत्करून भाजपसोबत आहेत. मात्र, गरज सरो, वैद्य मरो, अशी भाजपची भूमिका असल्याने अजित पवार यांना अडचणीत आणणारी विधाने मिंधे गट आणि भाजपकडून करण्यात येत आहेत. आज पहिला बळी अजित पवार गटाचा जाणार असेल, तर उद्या मिंधे गटाचा बळी जाणार, हे निश्चित आहे”, असे भाकितही संजय राऊतांनी केले.