भाजप आजवर कधीच फुटला नाही कारण…

0
173

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वपक्षाचं कौतुक करतानाच विरोधी पक्षांवर टीका केली. तसेच, इतर पक्ष फुटण्यामागे स्वार्थी, आत्मकेंद्री नेते असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. एकीकडे फुटलेल्या पक्षांमधील गट किंवा नेते मोठ्या प्रमाणावर भाजपामध्ये आलेले असताना दुसरीकडे फडणवीसांनी इतर पक्षांमधील फुटीबाबत केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

भाजपाच्या स्थापनादिनी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी फडणवीसांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा जगातला सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केला. “भाजपा आज जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. जगात सर्वाधिक सदस्य भाजपाचे आहेत. भारतात सर्वाधिक खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य, महापौर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य भाजपाचे आहेत”, असं ते म्हणाले.

भाजपात कधीच फूट पडली नसल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. “देशाच्या इतिहासात एकच असा राष्ट्रीय पक्ष आहे ज्यात कधीच उभी फूट पडली नाही. देशातल्या प्रत्येक पक्षात कधी ना कधी फूट पडली. काँग्रेसच्या तर इतक्या काँग्रेस झाल्या की त्या आता मोजता येणार नाहीत. कम्युनिस्ट पक्षात फूट पडली. समाजवादी पक्षाची तर एवढी शकलं पडली की मोजायला बसलो तर वेळ कमी पडेल. पण भाजपा एकमेव असा पक्ष आहे की पहिल्यापासून आजपर्यंत या पक्षात कधीच फूट पडली नाही. हा पक्ष एकसंघ राहिला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.