भाजप अशा प्रकारे ३०० पार होणार – प्रशांत किशोर

0
215

यंदाच्या निवडणुका राष्ट्रीय पातळीवरील दोन आघाड्यांमुळे विशेष चर्चेत आल्या आहेत. एकीकडे भाजपाप्रणीत सत्ताधारी एनडीए आहे तर दुसरीकडे भाजपाविरोधी पक्षांनी मिळून स्थापन केलेली इंडिया आघाडी आहे. इंडिया आघाडीमधील काही पक्षांनी स्वतंत्र मार्ग स्वीकारल्याचीही घोषणा केली आहे. मात्र, त्या त्या राज्यांत या पक्षांचा भाजपा किंवा त्यांच्या मित्रपक्षांना सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक नेमकी कोणत्या बाजूने झुकणार? याविषयी राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी यासंदर्भात पीटीआयशी बोलताना त्यांचं विश्लेषण मांडलं आहे.

भाजपासाठी पूर्व व दक्षिण भारतात यश
प्रशांत किशोर यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय जनता पक्षासाठी पूर्व व दक्षिण भारतामध्ये दिलासादायक निकाल लागण्याचा अंदाज वर्तवला आहे. “यंदाच्या निवडणुकीत प्रामुख्याने पूर्व आणि दक्षिण भारतात भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढतील. त्याशिवाय भाजपाला मिळणाऱ्या मतांचं प्रमाणही यावेळी वाढेल. तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये हे वाढलेल्या मतांचं प्रमाण भाजपासाठी महत्त्वाचं ठरेल. मी हे जवळपास वर्षभरापूर्वी सांगितलं आहे की यावेळी पहिल्यांदाच भाजपाला तमिळनाडूमध्ये दोनअंकी मतांची टक्केवारी गाठण्यात यश येईल”, असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

तेलंगणात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर
दरम्यान, एकीकडे तमिळनाडूमध्ये दोनअंकी मतांची टक्केवारी भाजपासाठी मोठं यश ठरू शकतं असा दावा प्रशांत किशोर यांनी केला असताना दुसरीकडे तेलंगणामध्ये भाजपासाठी त्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचं यश अंदाजित केलं आहे. “तेलंगणामध्ये भाजपा पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असेल. ही भारतीय जनता पक्षासाठी फार मोठी बाब असेल. ओडिसामध्ये ते नक्कीच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असतील”, असं प्रशांत किशोर म्हणाले.

“…तर राहुल गांधींनी राजकारणातून एक पाऊल मागे घ्यावे”, प्रशांत किशोर यांचा सल्ला

सर्वात आश्चर्यकारक निकाल पश्चिम बंगालचे!
प्रशांत किशोर यांना पश्चिम बंगालचे निकाल सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारे ठरू शकतात असं वाटत आहे. “सर्वात आश्चर्यकारक निकाल पश्चिम बंगालचे लागण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची दाट शक्यता आहे. बिहारमध्येही ते पहिल्या क्रमांकावर असतील. तिथे भाजपा जरी फक्त १७ जागा लढवत असले, तरी त्यांच्या निवडून येणाऱ्या खासदारांचं प्रमाण इतरांपेक्षा जास्त असेल”, असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत.