भाजपा-शिंदे गट आणि मनसेची युती होणार?

0
233

मुंबई , दि. २३ (पीसीबी) – मागील काही दिवसांपासून भाजपा-शिंदे गट आणि मनसे नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तसेच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. हे तिन्ही नेते दोन दिवसांपूर्वीच शिवाजी पार्कवर झालेल्या मनसेच्या दीपोत्सव मेळाव्यातही एकत्र दिसले होते. त्यामुळे या सर्व भेटीगाठी म्हणजे भविष्यातील युतीची नांदी तर नाही ना? अशा चर्चा रंगू लागल्या असतानाच, मनसे आमदार राजू पाटील यांनी युतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अंबरनाथमध्ये दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“काही गोष्टी राजकारण सोडूनही बघितल्या पाहिजेत. सरकारमध्ये नसलेल्या आमच्यासारख्या पक्षाला जर सरकारकडून काही सकारात्मक प्रतिसाद येत असेल, आमच्या मागण्या मान्य होत असतील, तर अशा सरकारच्या जवळ येण्यास काही हरकत नाही. मागच्या सरकारमध्ये कोणी आमच्या मागण्यांची दखलच घेत नव्हते. एखादी मागणी केली की, तर ती मागणी पूर्ण कशी होणार नाही, याकडे जास्त लक्ष दिले जात होते. मात्र, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे ही जवळीक वाढली आहे”, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

भाजपा-शिंदे गट-मनसे युती होणार का? असे विचारले असता, ते म्हणाले, “भापजा-शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांमध्ये होण्याऱ्या भेटीगाठींचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही स्वबळावर लढणार आहोत. मात्र, अशी जर युतीबाबत परिस्थिती निर्माण झाली. तर युती करायलाही हरकत नाही. अशी वेळ आली आणि राज ठाकरेंनी होकार दिला तर आम्हीही त्यासाठी तयार असू”