भाजपा शहराध्यक्षपदी शंकरशेठ जगताप

0
788

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकित पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे स्थान बळकट करायचे म्हणून माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांची पक्षाच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यासंदर्भातील पत्र दिले आहे. दरम्यान, चालू राजकीय घडामोडी विचारात घेऊन भाजपने बहुतांश जिल्हाध्यक्ष बदलले असून पुणे शहराची धुरा धीरज घाटे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.


भाजपचे मावळते शहराध्यक्ष आमदेर महेश लांडगे यांची मुदत सहा महिन्यापूर्वीच संपली होती. पुन्हा त्यांचीच फेरनिवड करण्याची मागणी एका गटाने लावून धरली होती. राज्यातील राजकीय घडामोडीमुळे भाजपनेही आपली संघटनात्मक व्युहरचना ताबडतोब बदलली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने पिंपरी चिंचवड शहरात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे धाकटे बंधू शंकरशेठ जगताप यांच्याकडे सर्व सुत्रे सोपविण्यात आली. २०१७ मध्ये लक्ष्मण जगताप यांनी अजित पवार यांच्याशी थेट पंगा घेत महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता खेचून घेतली आणि भाजपला शहरात स्थान निर्माण करून दिले होते.
महापालिकेत नगरसेवक म्हणून शंकरशेठ जगताप यांनी काम पाहिले. नंतरच्या काळात मावळ लोकसभा मतदारसंघातून इच्छुकांच्या यादीत त्यांचे नाव होते. २०१९ मध्ये चिंचवड विधानसभा सार्वत्रीक निवडणूक तसेच सहा महिन्यांपूर्वी झालेल्या चिंचवड पोटनिवडणुकिसाठीही त्यांचे नाव आघाडीवर होते. आमदार जगताप यांच्या पत्नी अश्विनीताई यांनी आमदार व्हायची इच्छा प्रगट केल्याने भाजपने त्यांना संधी दिली. त्याचवेळी शंकरशेठ यांच्याकडे शहराचे नेतृत्व सोपविण्याची चर्चा सुरू होती.

शहराध्यक्ष, जिल्ह्याध्यक्षांची नियुक्ती करताना भाजपने काही निकष निश्चित केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने खासदार, आमदार पदावर असलेल्यांना, तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या इच्छुकांना आणि विद्यमान अध्यक्ष यापैकी कोणाचीही निवड न करण्याचे निश्चित करण्यात आले होते.

अध्यक्षपदासाठी कोण सक्षम आहे, याची चाचपणी मे महिन्यात प्रभारींकडून करण्यात आली होती. शहरातील विधानसभा अध्यक्ष, विविध आघाड्यांचे प्रमुखांबरोबर त्यादृष्टीने चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार नावे निश्चित केली होती.