मुंबई, दि. १० (पीसीबी) – देशात महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही राजकीय उलथापालथ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपा त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाच संपवतो, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी पंजाबमधील शिरोमणी अकाल दलाचं उदाहरणही दिलं आणि अकाली दलाला भाजपाने संपवल्याचा आरोप केला.
शरद पवार म्हणाले, “प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाही आणि आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील, असं विधान भाजपाकडून करण्यात आलं. यातून नितीश कुमार यांनी केलेली तक्रार स्पष्ट होते.”
“भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो. कारण पंजाबमध्ये अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा मोठा नेता त्यांच्यासोबत होता. आज तो पक्ष जवळपास संपुष्टात आला आहे,” असा आरोप शरद पवारांनी केला.
दरम्यान, बिहार भाजपाचे नेते सुशील मोदी यांनीही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलंय. ते म्हणाले, “भाजपाने कधीही आपल्या मित्रपक्षाला धोका दिलेला नाही. ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांचाच पक्ष आम्ही फोडला. महाराष्ट्रात शिवसेनेची भाजपासोबत युती होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने धोका दिल्याने त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला.”
“राजद, काँग्रेस, जेडीयू पक्ष एकत्र आले तर लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पराभूत करू असा तिन्ही पक्षांचा गैरसमज आहे. ते हे विसरत आहेत की नरेंद्र मोदींची लोकप्रियता २०१४, २०१९ पेक्षाही अनेकपट जास्त आहे,” असं मोदी यांनी सांगितलं.
“त्यांनी कितीही ताकद लावली तरी ते मोदींना २०२४ मध्ये पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकणार नाही. आम्ही बिहारमध्ये प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ. आज लिहून ठेवा, हे सरकार २०२५ वर्षही पूर्ण करू शकणार नाही. त्याआधीच हे सरकार कोसळेल,” असा इशाराही मोदींनी दिला.












































