भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे ?

0
294

मुंबई, दि. ९ (पीसीबी) : चंद्रकांत पाटील यांची शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेटमध्ये वर्णी लागल्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर खांदेपालट होण्याची शक्यता आहे. याआधी आशिष शेलार यांचे नाव भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होते, मात्र आता दुसऱ्याच नेत्याचे नाव चर्चेत आले आहे. विदर्भातील भाजपचा बडा चेहरा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोण आहेत चंद्रशेखर बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा मंत्रिपदाची धुरा होती. डिसेंबर २०१४ मध्ये नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी नागपुरातील कामठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २००४, २००९, २०१४ असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपने २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले नाही, ते त्यांच्या पत्नी ज्योती यांना देण्यात आले, त्यांनी कामठी येथून निवडणुकीचा फॉर्म भरला, परंतु शेवटच्या क्षणी, फॉर्म भरल्यानंतर, ज्योती यांना भाजपने एबी फॉर्म नाकारला होता. त्यामुळे बावनकुळेंना पाठिंबा देणारा तेली समाज मोठ्या प्रमाणावर नाराज झाला आणि विदर्भात १३ जागांवर भाजपाला फटका बसला होता.