भाजपा नेते सुनील देवधर पुणे लोकसभा निवडणूक लढण्यास तयार

0
212

पुणे, दि. २५ (पीसीबी) – भाजपा नेते सुनील देवधर यांनी पुणे लोकसभा निवडणूक लढण्यास तयारी दर्शवली आहे. पक्षाने जर संधी दिली तर मी निवडणूक लढण्यास तयार असल्याचे देवधर यांनी सांगितले आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून चर्चेत असणाऱ्या नावांमध्ये सुनील देवधर यांचही नाव चर्चेत आहे. शिवाय, सुनील देवधर हे मागील काही दिवसांपासून पुण्यात सामाजिकस्तरावर सक्रिय झाल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, देवधर यांच्याशिवाय भाजपकडून माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे यांचीही नावे चर्चेत आहेत.

या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना देवधर यांनी सांगितलं की, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने पंतप्रधान बनतील याबद्दल आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. एक गोष्ट नक्की आहे की पक्षाने जर संधी दिली तर आम्ही पक्षासाठी काहीही करायला तयार असतो. जनतेचं राजकारण करायला मला आवडतं. त्यामुळे मला अशी संधी मिळाली तर आवडेल.”

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी सुनील देवधर यांच्याशिवाय भाजपकडून माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे यांचीही नावे चर्चेत आहेत. एवढच नाही तर मध्यंतरी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही नावाच्या चर्चांनी समाजमाध्यमांवर जोर धरला होता.

सुनील देवधर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आहेत, शिवाय गृहमंत्री अमित शाह यांच्याही जवळचे असल्याचं बोललं जातं. त्रिपुरामध्ये भाजपला यश मिळवून देण्यात त्यांचे मोठे काम असल्याचं दिसून आले आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते त्यांच्याबाबत सकारात्मक असल्याचंही बोललं जातं. त्यात आता त्यांनी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केल्याने, अन्य इच्छुकांमध्येही काहीशी अस्वस्थता निर्माण झाल्याचीही चर्चा आहे.