भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या कंपनीने ५२ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी गुन्हा .

0
298

मुंबई, दि. १ (पीसीबी) : आर्थिक गुन्हे शाखा अर्थात (EOW) ने भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर कारवाईला सुरुवात केली आहे. मोहित कंबोज यांच्यावर EOW ने मुंबईत गुन्हा दाखल केला आहे. मोहित कंबोज यांच्या कंपनीने ५२ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोहित कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून ५२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण हे पैसे ज्या कारणासाठी घेतले होते, त्याऐवजी इतरत्र वळवण्यात आले. नंतरच्या काळात मोहित कंबोज यांच्या कंपनीने हे कर्ज बुडवले होते.

या प्रकरणात मोहित कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता गुन्हा दाखल झाल्यामुळे मोहित कंबोज यांच्याविरुद्धच्या कारवाईचा वेग वाढू शकतो. हा कंबोज आणि भाजपसाठी धक्का ठरू शकतो. मोहित कंबोज यांच्यावर फसवणूक आणि कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, कंबोज यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

मोहित कंबोज यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ ट्विट केला आहे. मुंबई पोलिसांनी माझ्यावर एक गुन्हा दाखल केल्याचे समजते. २०१७ मध्ये बंद झालेल्या कंपनीसंदर्भात हा गुन्हा दाखल झाला आहे. त्या कंपनीतील बँक व्यवहारासंदर्भातील त्रुटी शोधून माझ्याविरोधात बनावट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारचा गुन्हा दाखल करून माझा आवाज दाबता येईल, असे महाविकास आघाडी सरकारला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. महाविकास आघाडी सरकारला संजय राऊत किंवा नवाब मलिकांवरील कारवाईचा बदला घ्यायचा असेल. माझी लढाई सुरूच राहील. मी न्यायालयात जाऊन या सगळ्याविरोधात कायदेशीररित्या दाद मागेन, असे मोहित कंबोज यांनी सांगितले.

गेल्या काही काळात मोहित कंबोज यांनी नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर अनेक आरोप केले होते. किरीट सोमय्या यांच्या बरोबरीने कंबोज हे महाविकास आघाडीवर हल्ला चढवण्यात आघाडीवर होते. मध्यंतरी मोहित कंबोज यांनी हनुमान चालीसा वादातही उडी घेतली होती. यावेळी त्यांनी मशिदींसमोर लावण्यासाठी मोठ्याप्रमाणावर भोंग्यांचे वाटप केले होते. राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत वाद सुरु असताना मातोश्रीपासून काही अंतरावर शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्लाही चढवला होता.