भाजपाने भ्रष्टाचाराची टांकसाळ उघडली आहे

0
244

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – राज्यातील विविध नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. खासकरून शिंदे गट आणि अजित पवार गटातील मंत्र्यांवर हजारो कोट्यवधींचा भ्रष्टाचाराचे दावा करण्यात आला होता. परंतु, ते आता भाजपासोबत सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्यावरील आरोप पुसले गेले असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येतो. यावरून ठाकरे गटाने भाजपावर सडकून टीका केली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

हसन मुश्रीफांची तुरुंगवारी टळली
ठाकरे गटाने सुरुवातीलाच हसन मुश्रीफांवर निशाणा साधला आहे. सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “हसन मुश्रीफ यांनी भारतीय जनता पक्षाचे वस्त्रहरण केले आहे. मुश्रीफ हे सध्या भाजपपुरस्कृत मंत्रिमंडळात आहेत. मुश्रीफ यांनी कोल्हापुरात सांगितले की, “हे भाजपवाले मला तुरुंगात टाकायला निघाले होते.” याचा अर्थ असा की, ते तुरुंगात टाकायला निघाले, पण आज मी त्यांच्याच सरकारमध्ये मंत्री आहे. संताजी घोरपडे साखर कारखाना, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या व्यवहारात अपहार केला, शेतकऱ्यांचे पैस लाटले, असा कांगावा भाजपच्या नागड्या पोपटलालने केला. त्यामुळे ‘ईडी’वगैरेंनी मुश्रीफांवर गुन्हे दाखल करून धाडी घातल्या. प्रकरण मुश्रीफ व त्यांच्या मुलांच्या अटकेपर्यंत गेले. हर्षवर्धन पाटलांप्रमाणे मुश्रीफ यांचीही झोप उडाली होती, पण मुश्रीफ यांनी अजित पवारांचे बोट पकडून भाजपपुरस्कृत सरकारात प्रवेश केला व त्यांची तुरुंगवारी टाळली.

कमरेवरच्या निऱ्यांनाच हात घातला
“मुश्रीफ यांनी भाजपच्या तंबूत प्रवेश केला नसता तर त्यांची अटक अटळ होती, पण भाजपने दयावान होऊन त्यांचे अपराध पोटात घेतले आणि ‘ईडी’ने त्यांची फाईल टेबलावरून उचलली व कपाटात बंद करून ठेवली. त्यामुळे मुश्रीफ यांना आता शांत झोप लागत असल्याचे त्यांनी सांगितले. मुश्रीफ यांनी अशा प्रकारे भाजपच्या कमरेवरील निऱ्यांनाच हात घातला. मोदी जाहीर सभांतून सांगत असतात, भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, देश लुटणाऱ्या कुणालाच सोडणार नाही. याचा आताचा अर्थ असा की, या सगळ्यांना पकडेन व भाजपमध्ये सामील करून मंत्री बनवेन”, अशी उपरोधिक टीका ठाकरे गटाने केली आहे.

“जसे त्यांनी अजित पवार, मुश्रीफ, प्रफुल पटेल, एकनाथ शिंदे, भुसे, भुजबळ, सरनाईक, सामंत वगैरे भ्रष्टाचाऱ्यांना पकडून शिक्षा म्हणून मंत्रिमंडळात सामील केले. भ्रष्टाचाऱ्यांची जागा आपल्या कायद्यानुसार तुरुंगात हवी, पण मोदींच्या संविधानानुसार ती जागा मंत्रिमंडळात आहे. पाच राज्यांतील निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप अध्यक्ष डॉ. नड्डा यांनी तर प्रचारात ‘चौकार’च मारला. राजस्थान व छत्तीसगड ही राज्ये म्हणजे भ्रष्टाचाराचा एटीएम झाल्याचे डॉ. नड्डा म्हणतात. मग केंद्रात व भाजपशासित राज्यांत तर भ्रष्टाचाराची टांकसाळच उघडली आहे, त्याचे काय?” असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

भ्रष्टाचाऱ्यांबरोबर मधुचंद्र साजरा करणार?
“अमित शहा यांनी तर ‘षटकार’च ठोकला. छत्तीसगडमध्ये भाजपाचे शासन आले तर भ्रष्टाचाऱ्यांना उलटे लटकवणार अशी तंबी गृहमंत्री शहा देत आहेत, पण भ्रष्टाचार फक्त छत्तीसगडमध्येच आहे काय? भ्रष्टाचाऱ्यांना छत्तीसगडमध्ये उलटे लटकवणार, मग इतर ठिकाणी काय भ्रष्टाचाऱ्यांबरोबर मधुचंद्र साजरा करणार? ज्या भ्रष्टाचाऱ्यांना उलटे लटकवायला हवे, त्यांना महाराष्ट्रात सरकारमध्ये सामील करून घेतले. या दुतोंडीगिरीस काय म्हणावे? हसन मुश्रीफ, अजित पवार, भुजबळ, सरनाईक यांना अद्याप क्लीन चिट मिळालेली नाही. हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या पैशांचा अपहार केल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले आहे. तरीही मुश्रीफ हे भाजपपुरस्कृत मंत्रिमंडळात आहेत. अजित पवारांचा शिखर बँक, सिंचन घोटाळा पंतप्रधान मोदी यांनीच उकरून काढला व चौथ्या दिवशी अजित पवारांना दुग्धस्नान वगैरे घालून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली”, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

भाजपच्या संस्कृतीने महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कारांचे वाभाडे काढले
“अब्दुल सत्तार, विखे पाटील, उदय सामंत यांचे कोट्यवधींचे घोटाळे समोर येऊनही अमित शहा त्यावर कारवाई करत नाहीत व छत्तीसगडमधील भ्रष्टाचाऱ्यांना उलटे लटकवण्याची भाषा करतात. भाजपने एखाद्यावर बोट ठेवले की, तो ‘गुन्हेगार’ व त्या गुन्हेगाराने भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये उडी घेतली की, तो ‘संत, असे एकंदरीत धोरण दिसते. महाराष्ट्र राज्याची इतकी अवहेलना कधीच झाली नव्हती. भाजपच्या संस्कृतीने महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कारांचे वाभाडे निघताना दिसत आहेत”, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

खोकेबाजीसाठी अमित शाह कोणाला उलटे लटकवणार?
“कर्नाटकात काँग्रेस नेत्यांवर धाडी पडत आहेत. कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पैशांचे घबाड जप्त केल्याचे बोलले जाते, पण महाराष्ट्रातील विद्यमान सत्ताधाऱ्यांना भ्रष्टाचाराचे पुरते अभय व मोकळे रानच देण्यात आले. भ्रष्टाचार किंवा टेंडरबाजीचे महाराष्ट्रातील ताजे प्रकरण पहा. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या भुयारी मार्गाच्या उभारणीची मूळ किंमत ५,२६० कोटी रुपये होती. चालू आर्थिक वर्षात या प्रकल्पासाठी एकूण ६५७२.१९ कोटी रुपये मंजूर केले. मात्र आता त्याच्या खर्चात आणखी वाढ केली असून त्यासाठी ७,७६५.०९ कोटी रुपयांचे नवे ‘टेंडर’ मंजूर केले. साधारण अडीच हजार कोटी वाढवून घेतले. ते कोणाच्या खोक्यात जाणार व या खोकेबाजीसाठी गृहमंत्री शहा कुणाला उलटे लटकवणार?”, असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे.

“रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत व त्यांच्या कुटुंबीयांचा शंभर कोटींचा डांबर घोटाळा समोर आला. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसीला खोटी बिले सादर करून कोट्यवधी रुपये खेचल्याचे हे प्रकरण धक्कादायक आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे म्हणजे रोज नवा भ्रष्टाचार करून राज्य लुटायचे असेच हे धोरण आहे. हे सगळे ‘महात्मा’ आज भाजपपुरस्कृत राज्य मंत्रिमंडळात आहेत. पंतप्रधान मोदी म्हणतात, एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार नाही. अमित शहा सांगतात, भ्रष्टाचाऱ्यांना उलटे टांगू, पण महाराष्ट्रात ज्यांना उलटे टांगायचे ते मोदी-शहांच्या चरणांशी बसून पाद्यपूजा करीत आहेत. ढोंगी लेकाचे!”, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे