भाजपाच्या बड्या तीन नेत्यांना वरिष्ठांची तंबी

0
391

मुंबई, दि. १० (पीसीबी) : भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या यादीत वरिष्ठ नेत्यांचा समावेश सहजासहजी झालेला नाही अशी माहिती पुढे येत आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मंत्र्यांने यापूर्वी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करू नये, अशी ताकीद दिल्यानंतरच त्यांच्या नावाला दिल्लीतून हिरवा झेंडा मिळाला.राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार काल झाला. यामध्ये भाजपच्या सर्व ९ मंत्र्यांमध्ये जुन्या व ज्येष्ठ मंत्र्यांना सामील करण्यात आले आहे. गुजरात पॅटर्ननुसार नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार अशी चर्चा होती. प्रत्यक्षात तसे होऊ शकले नाही. त्याचे कारण माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठांकडे जुन्या मंत्र्यांच्या नावासाठी आग्रह धरला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा दिल्लीवारी केली होती. त्यात मंत्रीमंडळ विस्तार हाच प्रमुख विषय होता. या दौऱ्यात फडणवीस यांनी जुन्या मंत्र्यांच्या नावाचा आग्रह धरला होता. पक्षश्रेष्ठी मात्र वेगळा विचार करीत असावी असे चित्र होते.यासंदर्भात गिरीष महाजन, चंद्रकांत पाटील यांसह विविध मंत्र्यांनी देखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांना यापूर्वीच्या सरकारमध्ये कामकाज करताना ज्या चुका केल्या, त्याची पुनरावृत्ती नको, असे त्यांना सांगण्यात आले होते, असे सुत्रांनी सांगितले.