भाजपाचे आता टार्गेट बारामती लोकसभा मतदारसंघ

0
281

बारामती, दि. ४ (पीसीबी) – बारामती लोकसभा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात अनेक बडे नेते बारामतीत येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या ता येत्या 22,23 व 24 तारखेला तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 6 तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघात येत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे कायम वर्चस्व असलेला बारामती मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत २०२४ मध्ये खेचून घ्यायचाच असा भाजपाचा निर्धार असून त्यासाठी केंद्रातून थेट अमित शाह सूत्रे हालवत आहेत.

आजवर स्वतः शरद पवार यांनी सहा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले, तर एकदा अजित पवार आणि दोन वेळी सुप्रिया सुळे या येथून निर्विवादपणे जिंकल्या आहेत. पवार यांचा पाडावर करण्यासाठी यापूर्वी दिवेंगत जेष्ठ नेते शंकरराव बाजीराव पाटील यांच्या मागे सर्व विरोधकांनी एकजूट केली होती, पण त्याला यश आले नाही.

जेष्ठ विधीज्ञ विराज काकडे यांच्या माध्यमातूनही पवार विरोधकांनी जोरदार प्रयत्न केला, पण काकडे यांनी सर्व ताकद लावूनही पवार जिंकले. भाजपाने डॉ. प्रतिभा लोखंडे यांना दोन वेळा उमेदवारी दिली होती, मात्र तेव्हासुध्दा अपयश आले. या मतदारसंघात धनगर समाज मोठा असल्याने त्या समाजाचे जेष्ठ नेते महादेव जानकर यांनाही उमेदवारी दिली, पण त्यांचाही सुप्रिया सुळे यांच्यापुढे निभाव लागला नाही. आता भाजपाने जाणीवपूर्वक दोन वर्षे आधीपासून नियोजन सुरू केले असून मतदारसंघातील संघटन मजबूत कऱण्यासाठी सर्व ती रसद पुरविण्याचे ठरवले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या ताब्यात येईल, यासाठी पक्षश्रेष्ठींनी केंद्रीय पातळीवरील बडे नेते बारामतीत येणार असल्याचे नियोजन केले आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत बारामतीतून भाजपचाच खासदार निवडून येईल, यासाठी दिल्लीवरून नियोजन सुरु आहे.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपने ए फॉर अमेठी ही मोहीम फत्ते करुन अमेठी ताब्यात घेतली. आता भाजपची नजर बारामतीवर असल्याने ‘बी फॉर बारामती’ ही मोहिम भाजपने हाती घेतली आहे,” असे बारामती लोकसभा मतदारसंघ भाजप प्रभारी राम शिंदे यांनी सांगितले.

इंदापूर येथील अर्बन बँकेच्या सभागृहात सीतारामन, बावनकुळे यांचा दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आयोजित भाजप संवाद बैठकीत राम शिंदे बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, किसन मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पृथ्वीराज जाचक, अविनाश मोटे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, मारुती वणवे, तेजस देवकाते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

राम शिंदे म्हणाले, “2019 ला कोणालाही वाटेल नव्हते अमेठीतील गांधी पराभूत होतील पण भाजपने ते करून दाखवले,आता 2024 ला बी फॉर बारामतीचे मिशन हाती घेतले आहे. यासाठीच अर्थमंत्री बारामती लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर येत आहेत,”

हर्षवर्धन पाटील म्हणाले, “बारामती लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर येणाऱ्या निर्मला सीतारामन याचे इंदापूर मध्ये भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून केंद्रीय पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. आता केंद्रात आणि राज्यात आपले सरकार असल्याने कोणत्याही विकास कामाना अडचण येणार नाही,”

यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यांच्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी विलास वाघमोडे, शहरध्यक्ष शकील सय्यद, ॲड. कृष्णाजी यादव, अशोक इजगुडे, गोरख शिंदे, शेखर पाटील,सुनील अरगडे, हरिभाऊ जाधव, बाळासाहेब मोरे, माऊली चवरे, पिंटू काळे, माऊली वाघमोडे, गजानन वाकसे उपस्थित होते.यावेळी तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी प्रास्ताविक केले. तानाजी थोरात यांनी आभार मानले.