भाजपाची प्रचंड फडफड, पक्ष सोडणाऱ्या बाबू नायर यांना सोशल मीडियातून धमक्या, शिवीगाळ सुरू

0
327

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – शहर सरचिटणीस पदाचा तसेच पुणे जिल्हा महामंत्रीपदाचा त्याग करून पिंपरी चिंचवड भाजपाला कायमचा रामराम करणाऱ्या केरळी समाजातील जेष्ठ कार्यकर्ते बाबू नायर यांना आता सोशल मीडियातून भाजपा पदाधकाऱ्यांकडून धमक्या आणि शिवीगाळ सुरू झाली आहे. दरम्यान, आजवर वसंत बोराटे, रवि लांडगे, माया बारणे, संजय नेवाळे या भूमीपूत्र नगरसेवकांनीही भाजपाला रामराम केला तेव्हा भाजपाचे निष्ठावंत पदाधिकारी मूग गिळून बसले होते. कारण स्थानिकांना बोलायची हिमंत नाही. माजी महापौर आझम पानसरे यांनी भाजपा सोडला, पण तिथे तोंड शिवले होते. नगरसेवक तुषार कामठे यांनी तर भाजपा आमदारांवर गंभीर आरोप केले. माजी नगरसवेक संतोष बारणे, राजू लोखंडे यांनीही भाजपावर दुगाण्या झाडत रामराम केला. याशिवाय आगामी काळात आणखी तब्बल ४५ माजी नगरसेवक भाजपा सोडून राष्ट्रवादी व शिवसेनेत जायच्या तयारीत आहेत. भाजपाच्या तळ्याला अक्षरशः गळती लागली नव्हे, तर मोठे भगदाड पडायला लागले आहे. मूळात असे ५० लोक अपेक्षेने आले होते म्हणून तर भाजपाची सत्ता आली होती.

आता भाजपाचे नाणे वाजत नाही म्हणून ते चालले. सत्तेसाठी भाजपाने त्यावेळी सोवळे गुंडाळून ठेवले होते, तत्वांशी तडजोड केली होती. शहर भाजपामध्ये आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे या पूर्वाश्रमिच्या राष्ट्रवादी नेत्यांची आयात झाली नसती तर इथे भाजपाची सत्तासुध्दा आली नसती. निष्ठावंतांच्या जीवावर १० नगरसेवक निवडूण येत नाहीत, सत्ता खूप दूरची गोष्ठ होती. त्यातच लोकसभा, विधानसभेला, विधानपरिषदेला आणि महापालिका निवडणुकीतसुध्दा तथाकथित निष्ठावंतांनी आपल्या निष्ठा किती रुपयांत विकल्या त्याचा उध्दार खुद्द आमदार महोदयांनी अनेकदा केला हे विसरता येत नाही. बाब नायर निष्ठावंत नव्हते हे त्यांनी पक्ष सोडल्यावर समजले.

निवडूण आलेले भाजपाचे ७० माजी नगरसवेक किंवा दोन आमदार निष्ठावंत आहेत असे म्हणायचे धाडस आहे का. भाजपाच्या आंदोलनात निष्ठावंत टाळकी सोडली तर एक नगरसेवक कधी फिरकत नाही. बाबू नायर सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून त्यांच्यावर तुटून पडणारे यापूर्वी ज्यांनी ज्यांनी पक्षांतर केले त्यांना धडा शिकवण्याची हिंमत दाखवणार आहेत का. पानसरे आले आणि गेले पण त्यांचा चार ओळींचा निषेध करु शकले नाहीत, कारण ती धमक नाही. खरे तर, आताच भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

आगामी संकटाची चाहूल लागल्याने तसेच शहरातील दीड लाख दाक्षणात्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बाबू नायर यांच्या जाण्यामुळे जो प्रचंड मोठा फटका बसणार आहे त्याची तीव्र जाण झाल्याने भाजपाची आता चरफड सुरू झाली आहे. बाबू नायर हे सुरवातीला काँग्रेसमध्ये होते तेव्हा महापालिकेत स्वीकृत सदस्यपदावर होते. नंतर भाजपामध्ये आले आणि पुन्हा महापालिका सभागृहात भाजपाकडून स्वीकृत सदस्य बनले. भाजपाचे जेष्ठ नेते आणि राज्य लोकलेखा समितीचे सलग दोनवेळा अध्यक्ष झालेल्या सचिन पटवर्धन यांचे बाबू नायर हे समर्थक समजले जातात. शहरात तब्बल दीड लाख केरळी बांधव आहेत, त्यांचे प्रतिनिधीत्व बाबू नायर करतात. त्यामुळेच नायर यांनी पक्ष सोडण्यामुळे भाजपाच्या हक्काच्या मतपटीला धक्का बसला आहे. त्यातून भाजपाचे हे पदाधिकारी संतापले आहेत. त्यांनी नायर यांना सोशल मीडियातून लाखोल्या वाहिल्या.

भाजपाचे सरचिटणीस राजू दुर्गे यांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे. ते म्हणतात,`सत्ता आली म्हणून भाजपामध्ये आलेल्या आणि भाजपाची भाड खाऊन भाजपावरच उलट्या तंगड्या करणाऱ्या कोणत्याच भाडखाऊची यापुढे सुटका नाही. आता बघाच तुम्ही निच औलादिंनो आता यापुढे तुमच्याबाबात काय घडते ते.`
भाजपाची दुसरी पोस्ट कैलास सानप यांची आहे. त्यात म्हटले आहे की,` याला चपलेने फोडा.हरामखोर भाजपामध्ये आला आणि आमच्यासारख्यांच्या दोन पोस्ट आडवल्या. याला कोणी भाजपामध्ये आणला त्याचाही निषेध. एक नगरसेवक आणि पुणे जिल्हा महामंत्री अशी दोन पदे घेऊन पळून गेला.`
शहर भाजपा पदाधिकाऱ्यांनी अशा काही पोस्ट व्हायरल केल्या आहेत. स्वतः बाबू नायर त्याबाबत नाराज आहेत. भाजपाची सत्ता जाणार याची जाणीव झाल्याने पक्षातील अस्वस्थता प्रचंड वाढली आहे, त्याचेच हे द्योतक आहे.