भाजपाची आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा

0
10
  • कार्यकर्ता मेळाव्यात मोठा गौप्यस्फोट

नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय वातारण सध्या चांगलेच तापले असून महायुतीत अंतर्गत संघर्षाचे वादळ पुन्हा एकदा उठले आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी महायुतीतील मित्र पक्षांवर थेट आरोप करत, भाजप आता स्वबळावर निवडणूक लढवेल, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

नुकत्याच झालेल्या भाजपा नंदुरबार तालुका अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावित यांनी स्पष्ट शब्दांत महायुतीतील मित्रपक्षांवर नाराजी व्यक्त करत, त्यांनी महायुतीच्या विरोधात काम करत विरोधकांना मदत केल्याचा गंभीर आरोप केला. या वक्तव्यामुळे जिल्ह्यात महायुतीच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

“आम्ही युतीबिती करणार नाही, हे आजच स्पष्ट करतो. आमच्या मतदारसंघात आम्ही कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक बोलतात आणि दुसरे करतात, आम्हाला त्यात सहभागी व्हायचं नाही. आमचं स्वबळच आमचं बल आहे,” असे ठाम मत गावित यांनी व्यक्त केले.


गावित यांच्या या वक्तव्यानंतर भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, नगरपालिका, आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये स्वबळावर उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांनी यावेळी हेही ठामपणे सांगितले की, “या सर्व संस्थांमध्ये भाजपाच सत्तेत येईल, हा आमचा आत्मविश्वास आहे.”

महायुतीच्या नावे होणाऱ्या एकतर्फी निर्णयांवर त्यांनी नाराजी व्यक्त करत स्पष्ट केले की, “युतीचा विचार नंदुरबार जिल्ह्यातून काढून टाका, आम्ही आमचं काम सुरु केलं आहे, तुम्ही तुमचं करा,” असे वक्तव्य त्यांनी उपस्थित नेत्यांसमोर ठणकावून सांगितले. या शब्दांनीच मेळाव्यात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं.

गावित यांनी मित्र पक्षांवर केलेले आरोप खूपच धक्कादायक ठरले आहेत. त्यांच्या मते, महायुतीतील काही घटकपक्षांनी मागील निवडणुकांमध्ये भाजपाच्या विरोधात गुप्तरित्या काम केले असून, विरोधकांना मदत करून भाजपाला कमजोर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच पुढील कोणत्याही निवडणुकीत भाजप युतीच्या आधारे चालणार नसून, स्वतःच्या ताकदीवर मैदानात उतरेल, अशी भूमिका पक्षातर्फे घेतली जात आहे.
या सगळ्या घडामोडी अधिकच महत्त्वाच्या ठरल्या आहेत कारण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विजयकुमार गावित यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे ही केवळ स्थानिक पातळीवरील नाराजी नसून, त्याला पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांची जोड असल्याचे संकेत मिळत आहेत.
गावित यांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.राजकीय जाणकारांच्या मते, येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्र पक्ष आमने-सामने उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महायुतीच्या एकसंधपणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

गावित यांनी यावेळी मतदारसंघातील जनतेच्या पाठिंब्याचा पुनः एकदा उल्लेख करत सांगितले की, “भाजप एकटाही लढला तरी नंदुरबारमध्ये विजय मिळवू शकतो, ही आमची खात्री आहे.” त्यांनी कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय होण्याचे आवाहन केले आणि “आपण आपले काम सुरू ठेवायचे, कोणत्याही दबावाला बळी पडायचे नाही,” असे सांगितले.

डॉ. विजयकुमार गावित यांच्या या घोषणेमुळे नंदुरबार जिल्ह्यात महायुतीच्या एकतेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून, मित्र पक्षांशी संबंधांवर पडदा टाकण्याचा विचार पक्षात सुरू झाला आहे. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीतील पक्षांमध्ये समन्वय साधला जाईल की संघर्षाची ठिणगी मोठा वणवा बनेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.