भाजपला पराभव दिसत होता म्हणूनच माघार, संस्कृतीचा निव्वळ मुलामा

0
321

परभणी, दि. १७ (पीसीबी) : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतली. मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, सर्वप्रथम ऋतुजा लटके यांचं अभिनंदन करते. भाजपनं माघार घेतली. कारण भाजपला स्पष्टपणे पराभव दिसत होता. सर्व सर्व्हे एजन्सीजनीसुद्धा हे संकेत दिले होते की, अंधेरीची जागा भाजपच्या हातातून जाणार आहे. त्यामुळं संवेदनशील राजकारण, संस्कृती हा भाजपचा मुलामा देण्याचा प्रयत्न आहे. हा सर्वत्र खोटा आहे. हा मुखवटा आहे, असा आरोप त्यांनी लावला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, बुंद से गई हो हौदसे नहीं आती. राज ठाकरे यांच्या पत्राचा काही परिणाम झाला आहे, असंही मला वाटत नाही. राज ठाकरे यांच्या पत्राचा परिणाम झाला असेल किंवा भाजप त्यांना मान देते असं जर वाटत असेल, तर माझं पुढचं आवाहन आहे.

राज ठाकरे यांचं म्हणणं भाजप ऐकते असा मनसेच्या भक्तांचा दावा असेल, तर आमची विनंती असेल त्यांना. राज ठाकरे यांनी तथाकथित महाशक्तीला एक पत्र लिहावं. महाराष्ट्राचा अपमान करणारे महामहीम राज्यापाल परत बोलावून घ्यावेत. ते काय त्यांचं ऐकतील, असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला.

गुजरातमध्ये गेलेला फॉक्सकॉन, वेदांता प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात यावा, यासाठी राज ठाकरे यांनी भाजपला पत्र लिहावं.
कावड्याला आलं उडायचं आणि फांदीला आलं बुडायचं. अंधेरीची जागा शिवसेनेची होती. शिवसेनेनं ती निर्विवाद जिंकली असती. पराभवाच्या भीतीनं भाजपनं जागा माघार घेतली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

बावनकुळे साहेब तुमचा आधीचा इतिहास तपासा, स्मृतीभ्रंस झाल्यासारखे वागू नका. भाजपला संवेदनशील राजकारण जपण्याची संस्कृती माहिती असती, तर कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपनं उमेदवार दिला नसता. पंढरपूरला भाजपनं उमेदवारी भरली नसती. भाजपला संस्कृती कळली असती, तर दोन दिवसांपूर्वी मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन केलं नसतं, अशी आठवणही सुषमा अंधारे यांनी भाजपला करून दिली.