भाजपला आता एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवारांची गरज राहिलेली नाही -रोहित पवार

0
3

दि. २८(पीसीबी) -महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला आता कोणत्याही कुबड्यांची गरज उरलेली नसून आमचा पक्ष स्वबळावर उभा आहे आणि आमचा पक्ष राज्यात ताकदीने काम करत आहे, असं परखड मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) मुंबईत व्यक्त केलं. याच वक्तव्याचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. भाजपाला आता कुबड्यांची गरज राहिलेली नाही. म्हणजेच त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गरज राहिलेली नाही. वापरा आणि फेकून द्या अशी त्यांची वृत्ती आहे, असं ते म्हणाले.

आमदार रोहित पवार म्हणाले, की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कालच स्पष्ट केलं की त्यांना आता कुबड्यांची गरज नाही. त्यांनी आधी ठाण्यात लक्ष्य साधलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्याची ताकद कमी केली आणि आता भाजपाने बारामतीकडे मोर्चा वळवला आहे. सरकारने वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटची चौकशी लावली आहे. अजित पवार या संस्थेत कार्यरत आहेत. सरकारच्या या कृतीनंतर त्यांनी बारामतीकडे मोर्चा वळवला आहे असं दिसतंय. मुळात ही हास्यास्पद गोष्ट आहे. सरकारला चौकशीच करायची असेल तर आम्ही आतापर्यंत बाहेर काढलेल्या घोटाळ्यांची चौकशी करा. त्या विषयांत या लोकांनी तोंडावर बोट ठेवलं आहे. तिथे काही करत नाहीत आणि इतर विषयात चौकशी लावली जाते.

भाजपाकडून अजित पवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटने केलेलं काम सर्वांनी पाहिलं आहे, सर्वांनी त्या कामाचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या संस्थेच्या कार्यक्रमाला आले होते. तिथे येण्यापूर्वी त्यांनी संस्थेच्या कामाची माहिती घेतली होती. तरी आता सरकारच्या पोटात काय दुखतंय ते समजलं नाही. मला असं वाटतंय की अजित पवार यांना टार्गेट केलं जात आहे, असंही रोहित पवार म्हणाले.