भाजपमध्ये ‘पावन’ करुन घेतलेल्या ४५ नेत्यांची यादीच सभागृहात वाचून दाखवली…

0
239

मुंबई, दि. ४ (पीसीबी) : विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारने सोमवारी बहुमताचा ठराव जिंकला. त्यानंतर सभागृहात मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत प्रमुख नेत्यांनी भाग घेतला. त्यावेळी आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे खिळखिळ्या झालेल्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमक शैलीत भाजपवर प्रहार केला. ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून इतर पक्षांमधील आमदारांना भाजपमध्ये प्रवेश करण्यास प्रवृत्त केले जाते, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने केला जातो. भास्कर जाधव यांनीही याच आरोपाचा पुनरुच्चार करत गेल्या काही वर्षांमध्ये भाजपमध्ये ‘पावन’ करुन घेतलेल्या ४५ नेत्यांची यादीच सभागृहात वाचून दाखवली यावेळी भास्कर जाधव प्रचंड आवेशात होते.

यावेळी भास्कर जाधव यांनी म्हटले की, तुमच्या वर्मावर घाव पडतोय म्हणून माझं बोलणं ऐकून घेतलं जात नाही. भाजपने राष्ट्रवादीसोबत तुम्ही सत्ता स्थापन केली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? तुम्ही सगळ्यांच्या मागे ईडी लावत आहात. सगळ्या मराठी माणसांवर ईडी लावत आहात. प्रविण दरेकर, चित्रा वाघ, पडळकर, सुजय विखे, प्रसाद लाड, राम कदम, रणजित सिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, विजय गावित, दत्ता मोघे, सत्यजित देशमुख, काशिनाथ पवार, माणिकराव गावित, सुर्यकांता पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, सुरेश धस, प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे, नमिता मुंदडे, वैभव पिचड, कालिदास कोळंबर, आणखीकिती जणांना भाजप धुवून घेणार, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. यानंतर सभागृहात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. तुम्ही आम्हाला कोणतीही नोटीस न देता सभागृहात आमचे नाव घेतलेच कसे, असा आक्षेप संबंधित आमदारांनी घेतला.

सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून तुमची कृती सरकार पाडण्यासाठी होती. करोनासारखं संकट आलं, या संकटात सत्ता कोणाची आहे हे विसरुन राज्याला त्यातून बाहेर काढण्याचा आपला इतिहास आहे. पण तुमची कृती सरकार पाडण्याची होती. कधी कुणाच्या हातात भोंगा दिला, कुणाच्या हातात हनुमान चालिसा दिली, कधी नुपूर शर्मा, तर कधी सुशांत आणला. सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न केला. पण सत्ता उलटली नाही. एकनाथ शिंदे, तुम्ही ज्या भाजपच्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करता, संजय राठोड यांचं मंत्रिपद घालवण्यासाठी या भाजपने काय काय केलं? आता संजय राठोडांचं काय करता? प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांच्यावर चौकशी लावली. ज्यांच्यामागे ईडीची चौकशी लावली आज त्यांच्याच घराखाली केंद्र सरकारचे पहारे देऊन त्यांना वाचवावे लागत आहे. हा नियतीचा न्याय आहे, असे भास्कर जाधव यांनी भाजपला सुनावले.