दि.३१(पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरीच्या धास्तीने भाजपने उमेदवारांचे ‘एबी’ अर्ज थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केले. भाजपने १९ आयारामांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या दोन माजी महापौरांनी थेट भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही पक्षांमध्ये शेवटपर्यंत नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. शेवटपर्यंत कमालीची गुप्तता पाळली असून, अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे टाळले. आज (बुधवारी) अर्ज छाननीनंतरच अधिकृत उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल.
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत होती. शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली. प्रमुख पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने बंडखोरी टाळण्यासाठी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही.
बंडखोरी टाळण्यासाठी भाजप आमदारांनी स्वतः निवडणूक अधिकाऱ्यांकडे ‘एबी’ अर्ज जमा केले. परंतु, उमेदवारी नाकारल्याने भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेविका करुणा चिंचवडे यांचे पती शेखर चिंचवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या माजी महापौर शकुंतला धराडे, अपर्णा डोके यांना भाजपने उमेदवारी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातून आलेले राजू मिसाळ, प्रशांत शितोळे, उषा वाघेरे, शकुंतला धराडे, अपर्णा डोके, समीर मासूळकर यांच्या पत्नी शीतल, प्रसाद शेट्टी, प्रवीण भालेकर, जालिंदर शिंदे, अनुराधा गोफणे, आशा सूर्यवंशी, कुशाग्र कदम, शिवसेना (ठाकरे) पक्षातून आलेले माजी नगरसेवक रवी लांडगे, अमित गावडे, मीनल यादव, संजय काटे, सचिन सानप यांच्या पत्नी रिटा सानप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातून आलेले राहुल कलाटे काँग्रेसमधून आलेले सद्गुरू कदम, या आयारामांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
भाजपने उमेदवारी डावलले माजी नगरसेवक
माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, शारदा सोनवणे, निर्मला कुटे, सीमा चौघुले, माधवी राजापूरे, माधुरी कुलकर्णी, सुनीता तापकीर, अश्विनी बोबडे, सुवर्णा बुर्डे, स्वीनल म्हेत्रे, निर्मला गायकवाड, यशोदा बोईनवाड, करुणा चिंचवडे, कोमल मेवानी या नगरसेवकांना भाजपने उमेदवारीत डावलले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात गेलेले माजी नगरसेवक
भाजपच्या सीमा सावळे, अश्विनी जाधव, अश्विनी चिंचवडे, भीमाबाई फुगे, प्रियंका बारसे, संदीप वाघेरे, अंबरनाथ कांबळे, लक्ष्मण सस्ते, शिवसेना (ठाकरे) सचिन भोसले यांच्या पत्नी वर्षा भोसले, रेखा दर्शिले, धनंजय आल्हाट, शिवसेना (शिंदे) प्रमोद कुटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने उमेदवारी दिली आहे.











































