नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी भाजपने 5,500 कोटींमध्ये 277 आमदार विकत घेतल्याचा आरोप केला. केजरीवालांनी या 277 आमदारांना पैसा वाटून भाजपमध्ये प्रवेश दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच महागाई वाढली आहे कारण ते आमदार विकत घेण्यासाठी सर्वसामान्यांचा पैसा वापरत आहेत, असेही ते म्हणाले.केजरीवाल शुक्रवारी विधानसभेत बोलत होते. त्यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. केजरीवाल यांनी शुक्रवारी दिल्ली विधानसभेत त्यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर सोमवारी विधानसभेत चर्चा होणार आहे.
मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी छापेमारी बद्दल त्यांनी दावा केला आहे की सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर 14 तास छापे टाकले पण काहीही मिळाले नाही.ते म्हणाले की, सीबीआयला ना रोख रक्कम मिळाली ना दागिने. सीबीआयला छाप्यांदरम्यान जमीन किंवा मालमत्तेची कागदपत्रे किंवा गुन्हेगारी कागदपत्रेही सापडली नाहीत. हा छापा खोटा असल्याचा दावा त्यांनी केला. यापूर्वी 19 ऑगस्ट रोजी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापा टाकला होता. मनीष सिसोदिया यांच्यावर दिल्लीच्या अबकारी धोरणात अनियमितता झाल्याचा आरोप होता.
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी दिल्ली सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, दारू धोरणात गंभीर भ्रष्टाचार झाला आहे. त्यांचे (आपचे) आरोग्य मंत्री तुरुंगात आहेत आणि दारू मंत्री चौकशीत आहेत. ते म्हणाले, विचार करा ज्या राज्यात उत्पादन शुल्क मंत्री चौकशीच्या घेऱ्यात आहे, तेथील शिक्षणावर काय परिणाम होईल?