भाजपने सतत ओबीसीचा सतत द्वेषच केला – प्रा. हरी नरके

0
161

पुणे, दि. २७ (पीसीबी) : ‘सर्व चोरांचे नाव मोदी कसे काय असते’ असे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत कर्नाटकच्या प्रचार सभेत केले होते. राहुल गांधी यांनी मोदी या अडणावावरून अपमानास्पद टिप्पणी करताना ओबीसी समाज बांधवांचा अपमान केला, असा दावा करत भाजपने देशभर राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. ओबीसी समाजाचा अपमान राहुल गांधींनी केल्याचा आरोप भाजप करत आहे. यावरून आता जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी आंदोलन करणाऱ्याला भाजपला खडे बोल सुनावले आहेत. ‘भाजपाकडून सध्या ओबीसी प्रेमाची नौटंकी चालू आहे. हे पुतनामावशीचे प्रेम सध्या उफाळून का आले आहे? ज्यांनी आजवर ओबीसीचा सतत द्वेष केला, आर्थिक व शैक्षणिक कत्तल केली त्यांना आज ओबीसीचा एव्हढा पुळका का आलाय? असा सवाल हरी नरके यांनी केला आहे.

‘गेल्या आठ नऊ वर्षातले यांच्या सरकारचे प्रत्येक पाऊल ओबीसीविरोधी होते. आहे. ओबीसी विद्यार्थ्यांचा हक्काचा स्कॉलरशिप निधी भाजप सरकारने उच्च जातीतील गरीबांकडे वळवला. मुळात तो इतका तुटपुंजा होता की दरडोई दरवर्षी २२ रुपये म्हणजे महिन्याला दिड ते पावणेदोन रुपये, अशी घनघोर चेष्टा करणारे कोणत्या तोंडाने ओबीसीबद्दल बोलत आहेत? असा प्रश्न देखील नरके यांनी भाजपला विचारला आहे.

ओबीसींचा विकास रोखून धरण्यासाठी ओबीसी जनगणना रोखणाऱ्या मोदी सरकारला ओबीसीबद्दल बोलायचा अधिकारच नाही. रोहिणी आयोग नेमून ज्यांनी ओबीसीचे तुकडे केले त्यांनी ओबीसीबद्दल बोलावे? यांना ओबीसी वोटबँक हवीय पण ओबीसी सक्षम व्हायला नकोय, अशी टीका हरी नरके यांनी केली. मंडल आयोग उधळून लावण्यासाठी अडवाणींनी रथ यात्रेचे पाऊल उचलले. व्ही.पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. तेव्हा बीजेपीचे राज्यातील नेते धरमचंद चोरडिया मला म्हणाले होते, ओबीसी ही आमची धार्मिक हक्काची मतपेढी आहे. मंडल आयोग लागू करून व्हीपी ती पळवणार असतील तर आम्ही सरकार पाडू. मंडल आयोगाला संपूर्ण विरोध करूनही बुद्धिभेद आणि खोटा प्रचार यांच्या जोरावर भाजपने ओबीसी वोटबँक टिकवून ठेवली. असं नरके म्हणाले आहेत.

मोदी हे नावाला ओबीसी. पण त्यांचा अजेंडा संपूर्ण उच्चजातीय धार्जिणा असल्याचा आरोप हरी नरके यांनी केला. व्यक्ती कोणत्या जातीची आहे याला महत्व नाही. तिचा अग्रक्रम कशाला आहे, सरकार बजेट कशावर खर्च करते हे महत्वाचे, असल्याचं नरके म्हणाले. ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी संघ भाजप प्रत्येक पावलावर कट कारस्थाने करते नी पुन्हा आपणच ते मिळवून देऊ, अशी प्रचार यंत्रणा राबवून श्रेयही घेते. ओबीसीला सतत भ्रमित करून वापरून घेते, असं हरी नरके म्हणाले.