चिंचवड, दि. ३ (पीसीबी) राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे निकाल लागले आहेत. कसब्यात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांचा विजय झाला आहे. दरम्यान या पोटनिवडणुकीत भाजपने मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केल्याचे आरोप दोन्ही ठिकाणच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी केला आहे.
चिंचवडमध्ये भाजपच्या जगताप यांना एक लाख ३५ हजार ४९४ मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीच्या नाना काटे ९९ हजार ४२४ मते घेत दुसऱ्या स्थानावर राहिले. तर अपक्ष राहुल कलाटे यांना ४० हजार ७५ मते मिळाली आहेत. यात जगताप यांचा ३६ हजार मतांनी विजय झाला आहे. या निकालानंतर राष्ट्रवादीचे नाना काटे (Nana Kate) यांनी भाजपने पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याची टीका केली. तसेच बंडखोरीचा फटकाही महाविकास आघाडीला बसल्याचे त्यांनी कबूल केले.
“महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. चिंचवड मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळेच चिंचवडमध्ये मतदानही चांगले झाले. मात्र आम्हाला बंडखोरीचा फटका बसला आहे. अपक्ष कलाटेंना मिळालेली मतेही महाविकास आघाडीचीच आहेत. त्यांना थोडीफार वंचितची मते मिळाली असतील. बंडखोरी झाली नसती तर विजय आमचाच झाला असता.”
चिंचवडमध्ये भाजपने पैशाचा वापर केल्याचा आरोपही काटे यांनी केला. ते म्हणाले, “मतदानादिवशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचलून नेले. त्यानंतर भाजपने अतिशय जास्त प्रमाणात पैशाचा वापर केला. या निवडणुकीत सहानुभूतीचा कसलाही विषय आला नाही. सहानुभूती असती तर भाजपने पैसे वाटले नसते.”
आता पुन्हा जोमाने काम करू असेही काटे यांनी यावेळी नमूद केले. ते म्हणाले, “या निवडणुकीत सर्वांनी मनापासून काम केले. यापुढेही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोमाने काम करू. चिंचवड मतदारसंघातील मतदारांपर्यंत आता केले त्याच उर्जेने पोहचणार आहे.”