मावळ, दि. २९ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातील मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची शुक्रवारी (२९ एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. आज झालेल्या मतमोजणीत गत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळवले. तर, भाजपचा दारूण पराभव झाला.
मावळ बाजार समितीतील भाजपच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेलचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे प्रमुख स्थानिक आमदार राष्ट्रवादीचे सुनील शेळके या दोघांनीही आपल्याच पॅनेलचा विजय होणार, असल्याचा दावा केला होता. शेळकेंचा दावा खरा ठरला. सकाळी मतमोजणीला सुरवात झाल्यापासून शेळकेंच्या सहकार पॅनेलचे उमेदवार आघाडीवर होते.दुपारी पूर्ण निकाल आला.१८ पैकी १७ जागा राष्ट्रवादीच्या पॅनेलने पटकावल्या. तर,फक्त एका जागा भाजपच्या पॅनेलला मिळाली.
समितीच्या सोसायटीच नाही,तर ग्रामपंचायत मतदारसंघातील राष्ट्रवादीचे पूर्ण प्रभूत्व स्पष्ट झाले.समितीच्या सोसायटीच्या ११ पैकी ११ आणि ग्रामपंचायतीच्या चारपैकी चार आणि तोलारीतील एकमेव जागा सुद्धा आ. शेळकेंच्या पॅनेलने जिंकल्या.फक्त व्यापारी गटातील दोनपैकी एक जागा कपबशीला मिळाली. तर, दुसरी जागा विमानाने पटकावली. शेळकेंच्या सहकार पॅनेलचे पॅनेलचे निवडणूक चिन्ह असलेले विमानाने भरारी घेतली. तर, भाजपच्या पॅनेलचे चिन्ह असलेली कपबशी फुटली, अशी चर्चा मतमोजणीच्या ठिकाणी ऐकायला मिळाली.
या निवडणुकीतून मावळ हा एकेकाळचा भाजपचा बालेकिल्ला आता राष्ट्रवादीचा झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच आ. शेळके यांचा करिष्मा पुन्हा या निवडणुकीतून दिसून आला. २०१९ ला त्यांनी विधानसभेला प्रथम या भाजपच्या गडाला सुरुंग लावून तो मोठ्या फरकाने जिंकला. नंतर यावर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला.बाजार समितीनिमित्त त्यांची विजयाची हॅटट्रिक झाली.