भाजपने चारही शंकराचार्यांना वेड्यात काढलं – जितेंद्र आव्हाड

0
137

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – २२ जानेवारीला राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते आहे. या सोहळ्यावरुन राजकारण रंगताना दिसतं आहे. २२ जानेवारी आणि राम यांचा काहीही संबंध नाही असं आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच शंकराचार्यांनाही भाजपाने वेड्यात काढलं अशीही बोचरी टीका आज त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

भाजपाला निवडणुकीच्या आधी रामाच्या नावाने मत मागण्यासाठीच २२ जानेवारी ही तारीख निवडण्यात आली. या तारखेचा आणि रामाचा काही संबंध आहे का? त्यादिवशी रामनवमी किंवा इतर तसा दिवसही नाही. चारही शंकराचार्यांनी सांगितलं की वास्तू अपूर्ण आहे मंदिराची. त्या वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जात नाही. तुमच्या घराचं बांधकाम सुरु आहे आणि प्लास्टर झालं नसेल तर तुम्ही तरी राहायला जाल का? मात्र त्यांनी चार शंकराचार्यांनाच वेड्यात काढलं. भाजपाकडून विचारणा होते आहे की कोण शंकराचार्य? त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं? आदित्य शंकराचार्य हे शैव आणि वैष्णव गटांमध्ये जेव्हा अंतर पडलं होतं तेव्हा या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं. आदि शंकराचार्यांनी निर्माण केलेली ही पीठं आहेत. त्यांनाही मानणार नसाल तर तुम्हीच शंकराचार्य असं म्हणायची वेळ आल्याचंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

भाजपाचं पंचांगच वेगळं आहे
२२ जानेवारीला त्यांनी मुहूर्त काढला असेल. त्यांचं पंचांग वेगळं असेल. राम मंदिर होतंय यासाठी आम्ही आनंदी आहोत. राम सगळ्यांचा आहे. मी पण आनंदी आहे. भाजपाकडून तो राम आमचाच आहे असं सांगितलं जातं आहे. ते चुकीचं आहे. राम बहुजनांचा आहे, राम क्षत्रिय आहे त्यांनी तो नसेल तर सांगावं. बहुजन लोक मटण खातात. रामाबद्दल जे काही बोललो त्यावर मी खेद व्यक्त केला. त्यानंतर मी काही वक्तव्य केलंही नाही. तरीही उपमुख्यमंत्री मटण खाणाऱ्या माणसाला शेण खातो असं म्हणत असतील तर देशातले ८० लोक शेण खातात. तुमच्यातलेही लोक शेणच खातात मटण खात नाही. कधी कधी ते पण मटण खातात. त्यांनी मटण आणि शेण एक करुन टाकलं. असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

अध्यक्षांनी दिलेला निकाल दिल्लीहून टाइप करुन आणला होता
अध्यक्षांनी जो निकाल वाचला तो दिल्लीहून टाइप करुन आलेला निकाल आहे. सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंचा व्हीप योग्य ठरवला होतं. जो काही निकाल राहुल नार्वेकरांनी दिला तो अपेक्षित होता. आता पुढे काय होतंय बघू. असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच रामाची आठवण भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर होते. बाकी त्यांना कधीही राम आठवत नाही असंही आव्हाड म्हणाले आहेत.