भाजपने आयटी सेलचे प्रभारी अरुण यादव यांची केली हकालपट्टी

0
293

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) : गेल्या महिन्यात भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची पैगंबरांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी केली होती. आता भाजपने हरियाणा आयटी सेलचे प्रभारी अरुण यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. इस्लामविरोधी टि्वट केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ‘अरुण यादव यांना अटक करा,’ असा ट्रेंड काल सोशल मीडियावर होता. हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. त्यानंतर भाजपने ही कारवाई केली, २०१७ मध्ये यादव यांनी हे टि्वट केलं होते. सध्या ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हरियाणा भाजपने प्रसिद्ध पत्रक काढून यादव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केलं आहे. प्रदेशाध्यक्ष ओपी धनख़ड यांनी ही माहिती दिली. मात्र, याबाबत त्यांनी कोणतेही कारण दिलेले नाही. यादव यांच्याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.ऑल्ट न्यूजचे पत्रकार मोहम्मद झुबेर यांना जर अशाच एका टि्वट साठी अटक केली जाऊ शकते, तर अरुण यादव आणि नुपूर शर्मा यांच्या प्रकरणी पोलीस कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर नेटकरी विचारत आहेत.

मोहम्मद झुबेर यांना २७ जून रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यांना काल न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. झुबेर यांनी सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. कोठडीत आपल्या जीवाला धोका असल्याचे झुबेर यांनी याचिकेत म्हटले आहे.