मुंबई, दि. ११ (पीसीबी) : राज्यसभा निवडणुकीत मोठी दगाबाजी झाली आहे. शब्द देऊन ही दगाबाजी करण्यात आली आहे. या दगाबाज लोकांची यादी आमच्याकडे आहे, असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दगाबाजी करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. त्याचवेळी ते म्हणाले, माझ्या पराभवाचा प्रयत्न झाला. संजय राऊत यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजपने आमिषं, केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन हा विजय मिळवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते संजय पवार यांना होती. मोठा विजय झाला वगैरे चित्रे भाजपने निर्माण केलंय पण असं काही नाही, असा टोला संजय राऊत यांनी मारला आहे. त्याचवेळी त्यांनी माझ्या पराभवाचा प्रयत्न झाला, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. त्यांनी नाव न घेता काँग्रेस, राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. तर शब्द देऊनही मत न देणाऱ्या अपक्षांची नोंद घेतली आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेस राष्ट्रवादीचं नाव न घेता संजय राऊत यांनी हा इशारा दिलाय. राज्यसभा निवडणुकीत शब्द देऊनही शब्द न पाळणाऱ्यांची नोंद राज्य सरकारने केलीय, असा गंभीर इशारा संजय राऊत यांनी दिला. यावेळी त्यांनी थेट नावं घेऊन हा इशारा दिला. बहुजन विकास आघाडीने आपली तीन मतं शब्द देणार असल्याचे सांगितले, पण आम्हाला दिली नाहीत. देवेंद्र भुयाळ, संजय मामा शिंदे यांनी आम्हाला मतं दिलेली नाहीत, अशी माहिती राऊत यांनी दिली. तसेच, या निवडणुकमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरवल्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सुहास कांदे कायदेशीर लढा देणार आहेत, अशी माहिती राऊत यांनी यावेळी दिली.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक वगैरे अजिबात नाहीत असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच भाजपच्या कोट्यात फरक पडला नाही. पण अपक्षांच्या मतांच्या कोट्यात गंमती झाल्यात असं पवारांनी म्हटलंय. विरोधकांकडे जाणारं अपक्षांचं एक मत प्रफुल्ल पटेलांना मिळाल्याचा दावा पवारांनी केलाय. मात्र पवारांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांचंही कौतुक केलं.