भाजपने अनेक गुंडांना आश्रय दिला – काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर

0
232

पुणे, दि. ८ (पीसीबी) : कोथरुड भागात भरदिवसा गुंड शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. कोथरुड भागाची शहरात वेगळी ओळख आहे. या भागातील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याची गरज आहे. भारतीय जनता पक्षाने अनेक गुंडांना आश्रय दिल्याची टीका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी केली.

आमदार धंगेकर यांनी सोमवारी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससूनचे तत्कालीन अधीक्षक डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली. गुंड मोहोळचा भरदिवसा कोथरुड भागात खून झाला. वाढत्या गुन्हेगारीमुळे कोथरुडची ‘अशांत कोथरुड’ अशी ओळख निर्माण झाली आहे. कोथरुड भागात साहित्यिक, कलावंत वास्तव्यास आहेत. अनेक महत्त्वाच्या संस्था कोथरुड परिसरात आहेत. शिक्षणानिमित्त या भागात विद्यार्थी वास्तव्यास आहेत. अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळाली आहे. कोथरुडसह पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याची गरज आहे. त्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, असे धंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाचा तपास संथगतीने सुरू आहे. पाटील प्रकरणाचा तपास सुरू आहे की बंद झाला आहे, हे समजत नाही. चौकशीच्या समितीच्या अहवालात ससूनचे तत्कालीन अधीक्षक डॉ. संजीव ठाकूर दोषी आढळले. पोलिसांनी डॉ. ठाकूर यांच्यावर कारवाई केली नाही. पोलिसांनी त्यांना सहआरोपी केली नाही. डॉ. ठाकूर यांना याप्रकरणात अटक व्हायला हवी. ललितला मदत करणाऱ्या कारागृहातील अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. या प्रकरणामुळे पुण्याच्या नावलौकिकला बाधा पोहोचली आहे. याप्रकरणातील दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धंगेकर यांनी दिला.