भाजपच्या हक्काची चिंचवड विधानसभेची जागा राष्ट्रवादीकडे जाण्याचे संकेत

0
87

चिंचवड, दि. 08 (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या हक्काची जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसला जाण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपमध्ये आमदार अश्विनी जगताप यांच्या जागेवर त्यांचे धाकटे दिर शंकरशेठ जगताप यांना उमेदवारी देण्याचे भाजपने निश्चित केल्याने असंतोषाचा भडका उडाला. भाजपमधील १४ माजी नगरसेवकांनी उठाव केला असतानाच राष्ट्रवादीच्या शहरातील सर्व नगरसेवकांनीही प्रसंगी शरद पवार यांची तुतारी हातात घेण्याचा इशारा दिल्याने महायुतीत घबराट आहे. केवळ जगताप कुटुंबात उमेदवारीला विरोध असल्याने आता हा मतदारसंघ भाजपकडून राष्ट्रवादीला घेण्याचा गांभीर्याने विचार सुरू आहे. बारामती येथे अजित पवार यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकित खुद्द पवार यांनीच आपल्या कार्यकर्त्यांचा हट्ट पूरा करण्याची ग्वाही दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पुढच्या काही दिवसातच राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरे करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघात जाऊन अजित पवार लाडक्या बहि‍णींशी संवाद साधत आहेत. मात्र, पुण्याचे पालकमंत्री असल्याने व पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पहिल्यापासून राजकीय दबदबा असल्याने पुण्यातील काही जागांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दावा केला जात आहे. महायुतीमध्ये विद्यमान आमदाराची जागा त्या त्या पक्षाकडे देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे,स्थानिक गणितं बिघडत असून आज चिंचवडमधील विधानसभेची जागा राष्ट्रवादीकडे घेऊ, असे आश्वासन अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या चिंचवडमधील नेत्यांना दिलं आहे.

महायुतीमध्ये सध्या पिंपरी चिंचवडची विधानसभेची जागा भाजपकडे आहे. या मतदारसंघातून भाजप नेते लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप ह्या आमदार आहेत. त्यामुळे, या जागेवर भाजपचा दावा असून अश्विनी जगताप यांना किंवा भाजपकडून जो उमेदवार दिला जाईल, त्यांस उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटातील स्थानिक नेत्यांनी या जागेसाठी आग्रह धरला आहे. तसेच, ही जागा राष्ट्रवादीला न सुटल्यास बंडखोरी करण्याचाही इशारा काहींनी दिलाय. त्यामुळे, आज बारामतीमध्ये अजित पवारांनी चिंचवडमधील नेत्यांना ही जागा राष्ट्रवादीकडे घेऊ असे आश्वासन दिल्याचे समजते.

शरद पवार सुरुंग लावणार?
महायुतीच्या जागावाटपात चिंचवडची जागा राष्ट्रवादीला मागू, असे आश्वासन अजित पवार यांनी बारामतीमध्ये झालेल्या बैठकीत समर्थकांना दिल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी माहिती आहे. मात्र, यातून समर्थकांचं समाधान होणार का? हा खरा प्रश्न आहे. ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला ती जागा. या महायुतीच्या धोरणानुसार चिंचवडची जागा भाजपला जाणार, हे उघड आहे. म्हणूनचं राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मविआत जाण्याचा इशारा, थेट अजित पवारांना दिला होता. हे पाहता भोसरीनंतर चिंचवडमध्येही अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे, अजित पवारांच्या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लागणार आहे, विशेष म्हणजे थेट शरद पवारच हा सुरुंग लावणार असल्याचे उघड राजकारण आहे. त्यामुळे, चिंचवडमध्ये राजकीय रणनीती काय काम करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आजच्या बारामतीतील बैठकीत अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनानंतर समर्थकांचं समाधान झालंय का? ते महायुतीचं जागावाटप होण्याची वाट पाहणार का? की तत्पूर्वीच तुतारी फुंकण्याचा निर्णय घेणार? याकडे राजकीय नेते व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे