भोसरीत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही – उध्दव ठाकरे

0
193

भाजपच्या रवी लांडगेंचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई, दि. २० ऑगस्ट (पीसीबी ) – शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला.रवी लांडगे ठाकरेंची मशाल हातात घेतल्याने भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकारणात आता रंगत आली आहे.पिंपरी, भोसरी, चिंचवड मतदारसंघात लढण्याची आमची इच्छा आहे. ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे सगळ्यांनी मिळून काम करायचे आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी भोसरी हा शिवसेनेचे बालेकिल्ला असल्याचे उल्लेख करून या जागेसाठी महाआघाडीत आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले.यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख सचिन अहिर, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, महापालिकेतील माजी सत्ताधारी नेते एकनाथ पवार, माजी नगरसवेक धनंजय आल्हाट तसेच शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

भोसरीच्या राजकारणाला नवे वळण –
पिंपरी चिंचवड शहरात भाजप ज्यांनी रुजवली आणि फोफावली त्या दिवंगत शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे यांचा सख्ख्या पुतण्या तसेच दिवंगत विरोधी पक्षनेते बाबासाहेब लांडगे यांचे चिरंजीव आहेत. रवी लांडगे यांच्यामुळे आता भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

दोन वर्षांपूर्वी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यापासून लांडगे अजित पवारांच्या संपर्कात होते. लोकसभेतही रवी लांडगेनी घड्याळाचा प्रचार दणक्यात केला. मात्र भोसरी विधानसभेची जागा भाजपला सुटणार असल्यानं आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केलेल्या रवी लांडगे यांना महायुतीतून उमेदवारी मिळणार नाही हे उघड होते. म्हणूनचं रवी लांडगे यांनी महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आधीचं शरद पवार गटात प्रवेश करत, तुतारीसाठी भोसरी विधानसभा मतदरसंघात दावा केला आहे. मविआमध्ये ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला ही मिळेल, ही शक्यता गृहीत धरून रवी लांडगे मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता मातोश्रीवर ठाकरेंच्या उपस्थितीत रवी लांडगे यांनी आज प्रवेश केला आहे. शहराच्या राजकारणाचा केंद्र बिंदू असलेल्या भोसरीतील राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे.