– साबळे, खाडे, पवार, जगताप, पटवर्धन, मोरे, पिल्ले कलाटे यांचा समावेश
पिंपरी, दि. ४ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीनेते अजित पवार यांचा डोळा असलेली पिंपरी चिंचवड महापालिका यापुढेही ताब्यात रहावी म्हणून प्रदेश संघटनेत शहरातील कार्यकर्त्यांना झुकते माप देण्यात आले आहे. प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे हे उद्योगनगरीतील एकमेव नेते कार्यकारणीत आहेत. १६ उपाध्यक्षांमध्ये दुसरे पिंपरी-चिंचवडकर आणि माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे आहेत. तर, शहरातील चिंचवड विधानसभा निरीक्षक शंकर जगताप, महापालिकेचे माजी सत्ताधारी नेते एकनाथ पवार, राज्य लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष अँड. सचिन पटवर्धन आणि माथाडी मंडळाचे माजी सदस्य अनुप मोरे तसेच संतोष कलाटे, राजेश पिल्ले यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.
भाजपची जंबो प्रदेश कार्यकारिणी बुधवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली. यामध्ये पिंपरी-चिंचवडला यावेळी गतवेळपेक्षा झुकते माप देण्यात आले आहे. मात्र पक्षात नुकताच प्रवेश झालेल्यांनाही या कार्यकारिणीत स्थान देण्यात आल्याने, भाजपच्या जुन्या निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा मोठा सूर उमटला आहे. महिलांना तुलनेने कमी संधी या नव्या कार्यकारिणीत देण्यात आली आहे. तसेच एक पद, एक व्यक्ती या तत्वालाही हरताळ फासला गेल्याचे दिसून आले आहे. कारण या नव्या नियुक्तीतून काहींकडे दोन-दोन पदे आली आहेत. त्यामुळे त्यांचा एका पदाचा राजीनामा पक्ष घेणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
दुसरीकडे संघटनकौशल्य असलेल्या जुन्या जाणत्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत. त्यांच्या नाराजीत आणखी भर पडली ती नुकतेच पक्षात आलेले शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख राम गावडे, शिरूरच्या माजी आमदार जयश्री पलांडे आदींना लगेचच विशेष निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आल्यामुळे, तसेच सर्व समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न झाला.
मागच्या कार्यकारिणीत पिंपरी चिंचवडमधील चारजण होते. यावेळी ही संख्या दुप्पट झाली आहे. पावणेचारशे जणांच्या या जंबो कार्यकारिणीत ६४ कार्यकारिणी सदस्य आहेत. खाडे हे गत कार्यकारिणीतही होते. त्या कार्यकारिणीत महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा असलेल्या पिंपरी-चिंचवडकर उमा खापरे या सध्या विधान परिषद सदस्या झाल्या आहेत.











































