भाजपच्या चित्रा वाघ यांनी केले मोहोळ यांच्या पत्नीचे सांत्वन

0
292

पुणे, दि. ११ (पीसीबी) : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी हत्या झाली होती. शरद मोहोळ याच्यावर भरदिवसा गोळ्या घालण्यात आल्या होता. मोहोळ याचा साथीदार असलेल्या मुन्ना पोळेकर याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हत्या केली होती. शरद मोहोळ हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. पोलिसांनी आठ आरोपींना अटक केलेली, आता आणखी दोघांना ताब्यात घेतलं आहे. अशातच भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली आहे.

स्वातीताई आणि मोहोळ कुटुंबीयांवर कोसळलेल्या संकटामध्ये त्यांचे सांत्वन करण्यासाठी आज आम्ही त्यांच्या पुण्यातल्या कोथरूडमधील निवासस्थानी भेट घेतली. तुमच्यावरील कुठल्याही संकटाच्या मुकाबल्यासाठी आम्हीही आपल्या सोबत असू, असा शब्द चित्रा वाघ यांनी यावेळी दिला.

हिंदुत्वाची पताका हाती धरलेल्या शरद मोहोळ यांचं काही काळापासून पुणे परिसरात हिंदुत्व जनजागृती गो रक्षण आणि लोकसेवेचं काम सुरू होतं. या कार्यात त्यांच्या पत्नी स्वातीताई याही खांद्याला खांदा देऊन साथ निभावत होत्या. पतीची साथ अर्ध्यावरच सुटली असली तरी स्वातीताई शरदभाऊंचं हिंदुत्व जागृतीचं काम नेटाने पुढं नेतील, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

स्वाती मोहोळ यांनी 2022 साली भाजपमध्ये चंद्रकांत पाटील, जगदीश मुळीक आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. चित्रा वाघ यांच्याआधी भाजप नेते नितेश राणे यांनी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली होती. मोहोळ कुंटुंबाने आपलं हिंदुत्त्ववादी काम सुरू ठेवायला हवं. ताईंनी ताकदीने आपलं काम पुढे घेऊन जावं. हिंदु समाजावर संकट आलं की शरद मोहोळ उभे राहिले असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी शरद मोहोळ याला कुख्यात गुंड असं म्हटलं होतं. मात्र भाजप नेते हिंदुत्त्ववादी म्हणत त्याची भेट घेत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.