भाजपच्या चिंचवड जागेवर अजितदादा समर्थकांचा दावा; प्रसंगी तुतारी फुंकू किंवा मशाल हाताता घेण्याचा इशारा

0
4

चिंचवड, दि. 25 (पीसीबी) : महायुतीत अधिकच्या जागा मिळवण्यासाठी अजित पवारांना कस लावावा लागणार आहे, अशातच चिंचवडमधील खंदे समर्थकांनी अजित दादांची कोंडी केली आहे. भाजपच्या वाट्याची चिंचवड विधानसभा जागा राष्ट्रवादीला घ्या, अन्यथा येत्या चार-पाच दिवसांत आम्ही तुतारी फुंकू अथवा मशाल पेटवू, असा इशारा राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी अजित दादांना दिला आहे. आत्ता आम्ही चौघे असलो तरी आमच्या सोबत एकूण 25 माजी नगरसेवक आहेत, त्यात भाजपच्या ही माजी नगरसेवकांचा समावेश असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

भाजपच्या वाट्याची चिंचवड विधानसभा जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही तर आम्ही मविआत जाऊ, मात्र भाजपचा प्रचार मुळीच करणार नाही. असा इशारा देत खंदे समर्थकांनी थेट अजित पवारांना आव्हान दिलं आहे. यानिमित्ताने अजित पवारांची थेट महायुतीत कोंडी होणार हे ही उघड झालं आहे. महायुतीमध्ये जागा वाटपात चिंचवड विधानसभेची जागा ही भाजपला, तर महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्या पक्षाला जाईल अशी दाट शक्यता आहे, तर या मतदारसंघातून तीव्र इच्छुक असणाऱ्या नाना काटे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील आता एकमेंकांचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आता पक्ष बदलाचा निर्णय घेणार असल्याचंही समर्थकांना म्हटलं आहे. त्यामुळे आता जागा मिळवण्यासाठी आणि या ठिकाणी आपला उमेदवार देण्यासाठी अजित पवारांची कोंडी समर्थकांनी केली आहे.

अजित पवार गटाचा ठराव; भोसरी-चिंचवडवर सांगितला दावा
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपनंतर अजित पवार गटाने नवा ठराव मंजूर केला आहे. भाजपने (BJP) बैठक घेऊन पिंपरी विधानसभेवर दावा केला, त्यानंतर आज अजित पवार गटाने ही बैठक घेतली त्यामध्ये भाजपच्या वाट्याला असणाऱ्या भोसरी-चिंचवड राष्ट्रवादीला घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. तसेच भाजप राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसेल तर आम्ही भोसरी आणि चिंचवडमध्ये ही प्रचार न करण्याचा निर्णय घेऊ शकतो, असा इशारा ही द्यायला अजित पवार गट विसरला नाही. या बैठकीत अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे स्वतः उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार न करण्याचा ठराव, भाजपचा राष्ट्रवादीला विरोध
पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही. असा ठराव करत भाजपने थेट आमदार अण्णा बनसोडेंना विरोध दर्शवला आहे. लोकसभेत कमळाचा उमेदवार मिळाला नाही आता आम्हाला कमळाचाचं उमेदवार हवा अशी आग्रही भूमिका बैठकीत एकमुखाने मांडण्यात आली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सूर लावल्याचं दिसून आलं. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीचा प्रचार केला नाही मग आपण घडाळ्याचा प्रचार का करायचा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ठरल्याप्रमाणे ही मागणी महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडे केली जाणार आहे, अशी माहिती आहे.