भाजपच्या आजी-माजी शहराध्यक्षांनी खासदार बारणे यांना दिल्या ‘हॅटट्रिक’साठी शुभेच्छा!

0
189
  • निमित्त वाढदिवसाचे, खलबते लोकसभा निवडणुकीची!

सांगवी, दि.५ (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाचे पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपचे आमदार महेश लांडगे व मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांची भेट झाली. भाजपच्या आजी-माजी शहराध्यक्षांनी यावेळी खासदार बारणे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये ‘हॅटट्रिक’साठी शुभेच्छा दिल्या.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पिंपळे गुरव येथील त्यांच्या बंगल्यावर पोहोचले. त्याचवेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे हे देखील त्या ठिकाणी आले. श्रीरंग बारणे व महेश लांडगे यांनी शंकर जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. निवडणुकांचा काळ असल्यामुळे त्यानंतर काही वेळ राजकीय व्यूहरचनेबाबत देखील या नेत्यांमध्ये चर्चा झाली.

भाजपा शिवसेनेबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी झाल्याने महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामांमुळे या निवडणुकीतही देशात ‘मोदी लाट’ आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची तर बारणे हे खासदारकीची ‘हॅटट्रिक’ करतील, या शब्दांत जगताप व लांडगे यांनी बारणे यांना शुभेच्छा दिल्या.

येत्या दोन दिवसात महायुती मधील सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक समन्वय बैठक होणार असून त्यात निवडणूक प्रचाराचे नियोजन करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.