भाजपच्या अहंकारामुळे युती तोडतोय – संदीप शिरसाट यांची घोषणा

0
12

दि.३०(पीसीबी)-छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर येत आहे. भाजपच्या भूमिकेमुळे युती तोडण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केली. “भाजपच्या अहंकारामुळेच युती तोडतोय,” असा थेट आरोप करत शिरसाट यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यामुळे संभाजीनगरातील शिंदेसेना–भाजप युतीत मोठा स्फोट झाला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, संभाजीनगरमध्ये युती व्हावी, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रयत्न केले. स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या. मात्र, सुरुवातीपासूनच स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी असल्याचे दिसून येत होते आणि त्यामुळे शंका निर्माण झाल्या होत्या. “मी सातत्याने स्थानिक नेत्यांशी संपर्कात होतो, फोनवरून चर्चा केल्या, देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू मानले जाणारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही बैठक झाली,” असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर जागावाटप ठरले होते
शिरसाट पुढे म्हणाले, “शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर जागावाटप ठरले होते. त्यामुळे त्या वेळी युती झाली, अशाच संभ्रमात आम्ही होतो. मात्र प्रत्यक्ष जागा देण्याची वेळ आली, तेव्हा शिवसेनेच्या जागाच सोडाव्यात, असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला. ही भूमिका आमच्या कार्यकर्त्यांना कदापि मान्य होणारी नव्हती.”
“एकीकडे युतीच्या चर्चा सुरू असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे शिवसेनेला कमी लेखणारे प्रस्ताव द्यायचे, ही दुहेरी भूमिका भाजपने घेतली,” असा आरोप करत त्यांनी स्पष्ट केले की, या घडीला सुद्धा भाजपकडून कोणताही नवा किंवा सन्मानजनक प्रस्ताव देण्यात आलेला नाही. उलट भाजपने आपली आग्रही भूमिका कायम ठेवली. आमची ताकद वाढली. आम्ही काहीही करू शकतो, असा त्यांना अहंकार होता. त्याचा अंत आज भाजप-शिवसेना युती तोडल्याने झाला, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.