भाजपचे ४ फेब्रुवारीपासून ‘गाव चलो अभियान’ :– शंकर जगताप

0
150

राज्यात लोकसभेच्या ४५ हून अधिक जागा जिंकण्यासाठी भाजपाची जोरदार तयारी

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) : गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारने गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, अंतर्गत सुरक्षा, सांस्कृतिक उन्नती आणि जगामध्ये भारताचा गौरव वाढविण्यासह विकासाच्या सर्व आयामांवर अतुलनीय कार्य केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची विकासाची दृष्टी गरीबांच्या कल्याणाकडे घेऊन आणि सरकारने केलेली विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या निर्देशानुसार “गाव चलो अभियान” सुरू करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत देशभरातील ७ लाख बूथवर कार्यकर्ते २४ तास कार्यरत राहणार आहेत. या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळ देण्यासाठी येत्या ४ ते ११ फेब्रुवारीदरम्यान पिंपरी चिंचवड शहरामध्ये “गाव चलो अभियान” बूथ पातळीवर सुरुवात करण्यात येत आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली आहे.

आज भाजपा शहर कार्यालय, पिंपरी येथे जिल्हा पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येणार असल्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, अभियान संयोजक भाजपा सरचिटणीस विलास मडिगेरी, चिंचवड विधानसभा सहसंयोजक ‍सिध्देश्वर बारणे, पिंपरी विधानसभा सह संयोजक महेंद्र बाविस्कर, भोसरी विधानसभा सह संयोजक पोपट हजारे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर, दि. १ फेब्रुवारी रोजी तीनही विधानसभा निहाय कार्यशाळा आयोजित करून अभियानाबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले.

बैठकीवेळी, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा आमदार आश्विनी जगताप, सरचिटणीस विलास मडिगेरी, नामदेव ढाके, अजय पाताडे, संजय मंगोडेकर, शैला मोळक, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ता राजू दूर्गे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस अनुप मोरे, उपाध्यक्ष माऊली थोरात, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वोच्च नेतृत्वाच्या सूचनेनुसार ४ ते ११ फेब्रुवारीदरम्यान गाव चलो अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानादरम्यान भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते २४ तास बूथ स्तरावरील बैठकीपासून ते घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधतील. त्याद्वारे सरकारच्या योजनांची माहिती देखील नागरिकांना देतील. त्यानुसार, प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. प्रत्येक बुथ वर कार्यकर्ते भेट देवून ते बूथ स्तरावरील बैठका घेतील. यानंतर २४ तासांच्या मुक्कामात नागरिकांसोबत संवाद साधतील, असे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने राज्यातील ४५ हून जागा जिंकण्याची रणनीती आखली आहे. भाजप पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक तयारी जोमाने सुरु आहे. पुणे जिल्हयातील मावळ, शिरूरसह चारही जागा भाजपच जिंकणार आहे. या अभियानाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. पक्षातर्फे ‘गाव चलो अभियान’ सुरू करण्याचे ठरविण्यात आले असून पक्षाचे सर्व कार्यकर्ते बूथ पातळीवर प्रचार करतील. गाव चलो अभियानाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक बूथवर विस्तारक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या १० वर्षातील योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतील, असे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले.