भाजपचे उद्या शक्तीप्रदर्शन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

0
2

दि.२१(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुन्हा स्वबळावर ताब्यात घेण्यासाठी भाजपने दंड थोपटले आहेत. उद्या (शनिवारी) सकाळी १० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला असून अनेक रथीमहरथींचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. या निमित्ताने जबरदस्त शक्तीप्रदर्शन कऱण्याचे नियोजन भाजपने केले आहे.

पिंपरी चिंचवड शहर आयोजित ’भव्य कार्यकर्ता’ मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे या दोघांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आ.महेश लांडगे, आ.शंकर जगताप, आ.उमा खापरे, आ.अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार श्रीमती अश्विनी जगताप व पक्षाचे सर्व सन्मानीय नेते उपस्थित राहणार आहेत.आजी-माजी नगरसेवक व सर्व इच्छुक उमेदवार यांनी आपल्या व्यक्तिगत कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शहराध्य़क्ष शत्रृघ्न काटे यांनी केले आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकित प्रचाराची दिशा काय असावी, राष्ट्रवादी काँग्रेस या आपल्या मित्र पक्षाच्या विरोधात कशा पध्दतीने लढत द्यायची, विरोधकांचे हल्ले कसे परतवून लावायचे आदी मुद्यांवर स्वतः चव्हाण हे मार्गदर्शन कऱणार आहेत.बिहार निकालामुळे राज्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांतून भाजपचीच सत्ता येणार असा माहोल असल्याने भाजपमध्ये इनकमिंग मोठे आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ठाणे-कल्याण महापालिकेत मोठ्या नेत्यांना प्रवेश देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिवचण्याचा प्रयत्न भाजपने केला आणि वादळ उठले. आता पिंपरी चिंचवड शहरातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांना प्रवेश देऊन आव्हान देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.