भोसरी, दि. ६ (पीसीबी) – भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर आलेल्या धमकीच्या मेसेज प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेसेज मध्ये महेश लांडगे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 4) सायंकाळी लांडगे यांच्या संपर्क कार्यालयात उघडकीस आला.
यश गणेश पवार (वय 20, रा. आळंदी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9424049105 क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांच्या मदतीसाठी परिवर्तन हेल्पलाईन सुरु केली आहे. मंगळवारी (दि. 4) सायंकाळी अज्ञाताने मेसेज केला. त्यामध्ये 30 लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास आमदार महेश लांडगे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची भीती घातली आहे. फिर्यादी हे परिवर्तन हेल्पलाईनवर काम करतात. त्यांनी हा मेसेज मंगळवारी रात्री पहिला. याबाबत बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.