दि.३१(पीसीबी)-विरोधी मतांची विभागणी करुण स्वतःची पोळी भाजून घेण्याची भाजपची खेळी यशस्वी ठरली आहे. सर्व विरोधक भाजप विरोधात एकवटले तर अनेक ठिकाणी धोका संभवतो. त्यावर रामबाण उपाय म्हणजे राज्यभर फोडा आणि राज्य करा (divide and rule) या नीतीचा अवलंब
केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) बरोबर लढणार आहे. शिवसेना (शिंदे) पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस स्वबळावर लढणार असून, शिवसेना (ठाकरे)-मनसेची युती झाली आहे. दिवसभराच्या राजकीय घडामोडींनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, काँग्रेस, शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे)-मनसे युती अशी पंचरंगी लढत होणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे) आणि रिपाइं हे तीन पक्ष महायुतीमध्ये एकत्रित लढण्याबाबत बोलणी सुरू होती. शिवसेनेने भाजपकडे २९ जागांची मागणी केली होती. पहिल्या बैठकीत १६, त्यानंतर १३ जागा देण्याबाबत चर्चा झाली. सोमवारी शेवटच्या बैठकीत शिवसेनेने दहा जागांची मागणी केली. परंतु, याबाबत सकारात्मक चर्चा झाली नाही. इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. मंगळवारी दुपारी अर्ज भरण्यास अडीच तास शिल्लक असताना साडेबारा वाजता युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले.
युती तुटल्याने शिंदे शिवसेना ६५ जागी
शिवसेना (शिंदे) – भाजप पक्षाची पारंपरिक युती आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत युती व्हावी, यासाठी पुढाकार घेतला होता. दुपारपर्यंत आमदार शंकर जगताप यांच्या संपर्कात होतो. परंतु, कार्यकर्ते ऐकत नसल्याचे त्यांनी सांगितले. युती तुटल्याचे वाईट वाटत आहे. २०१७ मध्येही ऐनवेळी दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. पण, संबंधांमध्ये कटुता आली नाही. टीका-टिप्पणी, रोष, आरोप करणार नसल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
दोन्ही ‘राष्ट्रवादी’ची आघाडी
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष ११० आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष १८ जागांवर निवडणूक लढवत आहे. प्रभाग क्रमांक नऊ आणि २० मध्ये एकमत झाले नाही. त्यामुळे या दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे कार्याध्यक्ष फजल शेख यांनी सांगितले.
काँग्रेससुद्धा स्वबळावर लढणार
काँग्रेसची शिवसेना (ठाकरे), वंचित बहुजन आघाडीसोबतचीही चर्चा अयशस्वी झाली. त्यामुळे काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ६० जागांवर उमेदवारीअर्ज दाखल केल्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल यांनी सांगितले.
शिवसेना (ठाकरे)-मनसे-रासपची युती
प्रभाग क्रमांक २२ वरून काँग्रेस-शिवसेना (ठाकरे) पक्षाची युती तुटली. शिवसेना (ठाकरे)- मनसे आणि राष्ट्रीय समाज पक्षाची युती झाली आहे. शिवसेना ६०, मनसे १७ आणि रासपने एका जागेसाठी उमेदवारीअर्ज दाखल केला असल्याचे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे शिवसेना (शिंदे) पक्षासोबत युती होऊ शकली नाही. भाजप आणि रिपाइं एकत्र निवडणूक लढविणार आहेत. रिपाइंला पाच जागा दिल्या असून, त्यांचे उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत, असे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.










































