पुणे,दि. १६ (पीसीबी)
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना देखील प्रचंड वेग आला आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या अॅक्टिव्ह मोडवर आहेत. कारण शरद पवार विधानसभा निवडणुकीसाठी भन्नाट अशी रणनिती आखत आहेत. अशातच आता भाजपचे वरिष्ठ नेते लवकरच राष्ट्रवादी गटात प्रवेश करणार आहेत अशी घोषणा करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का दिला होता. कोल्हापूरमध्ये समरजित घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. मात्र अशातच आता पुण्यात देखील भाजपचे वरिष्ठ नेते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार पुण्यात भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसत आहे.
पुण्यातील वडगाव शेरीमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण माजी आमदार आणि भाजपचे जेष्ठ नेते बापूसाहेब पठारे हे भाजपला रामराम करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बापूसाहेब पठारे यांची लवकरच घरवापसी होण्याची शक्यता आहे. बापूसाहेब पठारे हे हाती तुतारी घेणार असल्याचं त्यांनी एका गणपती मंडळाच्या कार्यक्रमात स्पष्ट केलं आहे