भाजपचा मोठा नेता पोहोचला अजितदादांच्या भेटीला, विधानभवनात खळबळ

0
588

मुंबई, 20 जून (पीसीबी) : विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आता अंतिम टप्यात पोहोचली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप आपआपल्या आमदारावर खास लक्ष ठेवून आहे. अशातच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे थेट राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले आहे. या भेटीमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या 10 जागांसाठी मतदान सुरू आहे. भाजपच्या आमदारांनी सकाळी पहिल्याच सत्रात मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर दुपारी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचले. दोन्ही नेत्यामध्ये यावेळी चर्चा झाली. पण, चर्चेचा तपशील समोर येऊ शकला नाही.

अजितदादांनी भेट घेऊन बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘मी अजित पवार यांची भेट घेतली. मात्र भेटीत कोणतीही राजकिय चर्चा केली नाही. मी देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही निरोप घेऊन गेलो नाही. मतदार संघातील कामांसंदर्भात अजितदादांशी संवाद साधला’ असं बावनकुळे म्हणाले.