भाजपचा कुबेर अडचणीत, लोढा यांच्या कुटुंबाचा वाद कोर्टात

0
4

मुंबई, दि. २२ –
राजकीय वादविवादामुळं चर्चेत असणारे मंत्री आणि भाजप नेते मंगलप्रभात लोढा त्यांच्या कौटुंबिक कलहामुळं चर्चेत आले आहेत. लोढा हे कोट्यावधींचे मालक आहेत पण उद्योग समुहाचा लोगो वापरण्यावरुन त्यांच्या दोन मुलांमध्ये झालेला वाद चव्हाट्यावर आला आहे. इतकेच नव्हे तर यांचा हा वाद न्यायालयात गेला आहे.

अभिषेक लोढा आणि अभिनंदन लोढा अशी नावं मंगलप्रभात लोढा यांच्या दोन मुलांची आहेत. दोन्ही मुलांमध्ये ‘लोढा’ हे नाव वापरण्यावरून वाद सुरु आहे. लोढा यांच्या मोठ्या मुलाने ‘लोढा’ हे नाव वापरण्यापासून रोखण्याच्या मागणीसाठी धाकट्या भावाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच अभिषेक लोढा यांनी 5 हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणीदेखील केली आहे. या सुरु झालेल्या वादामुळं आणखी एक प्रतिष्ठ घराणं दुभागणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएसई-लिस्टेड रिॲल्टी फर्म मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे सीईओ अभिषेक लोढा यांनी न्यायालयात लहान भाऊ अभिनंदन लोढा यांना त्यांच्या कुटुंबाचे नाव वापरण्यापासून रोखण्याची विनंती याचिका दाखल केली आहे. हा वाद हाऊस ऑफ अभिनंदन लोढा, लोढा व्हेंचर्सची रिअल इस्टेट शाखा या उद्योगसमुहावरुन रंगला आहे.

मॅक्रोटेक डेव्हलपर्सने याचिकेत ती लोढा समुहाची प्रमुख कंपनी असल्याचा दावा आहे. लोढा समुहातील कंपन्या व्यापारचिन्हाचा वापर करू शकतील, असा करार 2015 पर्यंत होता. 2015 मध्ये, अभिनंदन लोढा हे लोढा समुहापासून वेगळे होतील आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करतील असा निर्णय घेण्यात आला. मार्च 2017 मध्ये आणि नंतर 2023 मध्ये वेगळे होण्याच्या अटी निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार, अभिनंदन यांची कंपनी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा नावाने काम करेल, असा निर्णय घेण्यात आला. 2023 मध्ये झालेल्या करारात आपण सहभागी नव्हतो. त्यामुळे, त्यातील अटींना बांधील नसल्याचा दावाही अभिषेक यांच्या मॅक्रोटेक डेव्हेलपर्सने केला आहे. या प्रकरणावर 27 जानेवारीला सुनावणी होणार असून निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या कोट्यांवधींच्या संपत्तीची नोंद केली होती. त्या माहितीनुसार, त्यावेळी त्यांनी 436 कोटी 80 लाख 48 हजार 591 संपत्ती असल्याचे जाहिर केले होते. 2019 च्या निवडणुकीत लोढा यांनी 441 कोटींहून अधिक संपत्ती जाहीर केली होती.

या संपत्तीशिवाय त्यांच्यावर जवळपास 183 कोटींचं कर्ज आहे.लोढा यांच्यावर सध्या 182.93 कोटी रुपयांचे तर त्यांची पत्नी मंजुळा लोढा यांच्यावर 123.28 कोटी रुपयांचे कर्ज आहे. लोढा यांच्या नावावर एकूण 123 कोटी 38 लाख 98 हजार 588 रुपये इतकी संपत्ती आहे. तसेच पत्नीच्या नावावर 10 कोटी 28 लाख 75 हजार 340 रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांच्याकडे 125 कोटी 54 लाख 49 हजार 707 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.