भाजपचा आमदार साहेबांच्या राष्ट्रवादीत

0
102

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकानंतर राज्यातील राजकारणात काही बदलाचे वारे वाहताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीतील पक्षात प्रवेश केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात, मराठवाड्याती दोन ते तीन नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी भाजपच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला होता, त्यानंतर, आज माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाच्या सदस्यत्वासह सर्वच पदांचा राजीनामा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवारांच्या प्रमुख उपस्थित सुधाकर भालेराव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. या प्रवेशावेळी, बोलताना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्याचं दिसून आलं. तसेच, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील, याचे गणितही त्यांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून सुधाकर भालेवर हे भाजपला सोडचिठ्ठी देणार, अशी चर्चा रंगली होती. भाजपाला रामराम ठोकत ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रीवादीत सामील होतील, असेही सांगितले जात होते. अखेर आज भाजपच्या सर्व पदांचा राजीना दिल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी, बोलताना शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य केलं.

निवडणुका झाल्यावर राष्ट्रवादीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत. चित्र बदलायचं असेल तर राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी कार्यकर्ते येतात ही चांगली गोष्ट आहे. जबरदस्त शक्ती आपण उभी करायला लागलोय, एक उदगीर आणि देवळालीतील कार्यकर्ते येतायत, मागीलवेळी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून दिला. मात्र, या दोन्ही मतदारसंघातील उमेदवाराने मतदारांचा घात केलेला आहे. मतदारांनी मतं दिली, विधानसभेत पाठवलं त्यांची साथ सोडली आणि वेगळी भूमिका घेतली. पण, लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच, जे निवडून आले होते, त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं.

विधानसभेला 225 जागा जिंकू
सुधाकरराव भालेराव आणि इतर नेते आले आहेत, देवळालीतील देखील कार्यकर्ते आले आहेत. हे घर तुमच्या सर्वांचं आहे, सध्या महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. हे चित्र बदलवण्याच्या दृष्टीनं लोकसभेत मतदारांनी निकाल दिला. लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 लोकांना शक्ती देऊन वेगळा इतिहास घडवला. त्यामध्ये, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 लोकांना निवडून दिलं, ही सुरुवात आहे. आता, विधानसभेच्या 288 जागा आहेत, त्या जागेत 225 पेक्षा जास्त जागा आपल्या निवडून येतील, असे भाकितच शरद पवारांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे, कष्ट करणाऱ्यांना शक्ती देणारं राज्य आणुया, सत्तेत येत लोकांच्या जीवनात बदल आणण्याचा प्रयत्न करूयात. उद्योजक, व्यापारी असेल कोणताही घटक असेल देशात एक शक्तिशाली महाराष्ट्र राज्य निर्माण करूयात, असे म्हणत शरद पवार यांनी सुधाकर भालेराव यांच्या पक्षप्रवेशानंतर भाषणातून विधानसभेचं रणशिंग फुंकल्याचं दिसून आलं.

कोण आहेत सुधाकर भालेराव
सुधाकर भालेराव हे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली आहे. मात्र, भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याचे लक्षात घेऊन त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भालेराव आता तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवणार असतील तर महायुतीकडून उदगीर या मतदारसंघात कोणाला तिकीट मिळणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सुधाकर भालेराव 10 वर्षे सभागृहात होते
सुधाकर भालेराव यांच्यावर आमचे बऱ्याच दिवसापासून लक्ष होते, त्या मतदारसंघात आमच्या सहकाऱ्यांची चलबिचल होती. पण, विचारांचा पक्का माणूस आम्ही हुडकत होतो, मातंग समाजाचे देखील नेतृत्व त्यांनी केलंय. ते 10 वर्ष विधिमंडळात देखील ते होते. तसेच, महाराष्ट्रातून संघटन देखील त्यांनी निर्माण केलं आहे. पवार साहेबांनी 2019 सालीच सामाजिक न्याय खातं मागितलं होतं. मागे राहिलेल्या घटकांसाठी विशेष प्रयत्न आपण करूयात. विकासासाठी आपण काय करतोय? अल्पसंख्याक देखील आपण मागून घेतलं. ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती त्यांच्यावर देखील गोष्टी अवलंबून असतात, असे जयंत पाटील यांनी म्हटले.