नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – उत्तर प्रदेशात राज्यसभेत १० जागा खाली आहे. यासाठी उत्तर प्रदेश भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी ३५ नावांची यादी तयार केली आहे. यामध्ये कवी कुमार विश्वास प्रमुख दावेदार आहेत. सुधांशू त्रिवेदी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचा प्रस्ताव मांडताना या कुमार विश्वास यांच्या नावाचीही चर्चा करण्यात आली आहे.
राज्यसभेच्या जागांवर पुन्हा एकदा भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात थेट लढत पाहायला मिळू शकते. सध्या दोन्ही पक्षांना अनुक्रमे सात आणि तीन जागा मिळणे अपेक्षित आहे. तर उत्तर प्रदेश भाजपने राज्यसभेच्या ७ जागांसाठी ३५ नावांची यादी तयार केले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली, त्यात उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवल्या जाणाऱ्या नावावर चर्चा झाली. भाजपने सात जागांसाठी ३५ उमेदवारांचे पॅनल तयार केले असून, त्यात सुधांशू त्रिवेदी यांच्या नावाचाही समावेश आहे. तर कुमार विश्वास यांचेही नाव पॅनेलमध्ये ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.
कुमार विश्वास गाझियाबादमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात आहे. आता अशा परिस्थितीत त्यांना राज्यसभेवर पाठवणार की लोकसभेसाठी उमेदवारी करणार यावर सस्पेन्स कायम आहे.