पुणे, दि. 30 (पीसीबी) : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव ईव्हीएम मशीन विरोधात सध्या पुण्यामध्ये आंदोलनाला बसले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना खोचक टोला लगावला आहे. “बाबा आढाव यांच्यासारखे खरे सामाजिक कार्यकर्ते लोकशाही वाचावी म्हणून अशा पद्धतीने आंदोलन करत आहे. मात्र दुसरीकडे भाजपचे सरकार आल्यानं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करत नाही, ते आजारी असतील त्यामुळे आराम करत असतील”, असा खोचक टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. रोहित पवार यांच्या या टीकेवर आता अण्णा हजारे यांच्याकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अनेकदा अण्णा हजारे यांच्यावर याआधीदेखील टीका करण्यात आली आहे. त्यावरुन वाकयुद्ध देखील रंगलेलं बघायला मिळालेलं आहे.
महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावरून आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपचा मुख्यमंत्री होईल, असा दावा केला. “भाजपला अजित पवार यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तर एकनाथ शिंदे यांची चांदी आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपला अडसर करण्याचा प्रयत्न केला तर अजित पवारांची चांदी आहे. मात्र या गोष्टी दोघांना माहीत असल्याने ऐकण्याशिवाय पर्याय नाही”, असं रोहित पवारांनी म्हटलं. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना देखील मंत्रीपद देणार असल्याची चर्चा लोकांमध्ये असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलंय.
कर्जत जामखेडचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी फेर तपासणीची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवारांनी शिंदे यांच्यावर टीका केली. राम शिंदे यांनी फेर तपासणी करण्याची मागणी करत एकप्रकारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिलं असल्याचं रोहित पवार यांनी म्हंटल आहे. व्हीव्हीपॅटमध्ये काही गोंधळ आहे, असं मला वाटत नाही. पण ईव्हीएममध्ये गोंधळ असू शकते, असं रोहित पवारांनी म्हंटलं आहे.