भाजपकडून हात जरी पुढे आला तरी अजिबात स्वीकारला जाणार नाही

0
199

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – आम्ही त्यांना आधीच माफ केलं आहे, मनात कोणतीही कटुता नाही, असं सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि ठाकरे गटाला डिवचलं. यानंतर खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्याकडे माफ करा अशा मागण्या कोणी केल्या नव्हत्या, असं राऊत म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे त्यांची आणि उद्धव ठाकरेंमधली कटुता संपवण्याचे संकेत दिले. फडणवीस म्हणाले होते, “आमच्या मित्रांना कुणीतरी भांग पाजली होती. विरोधकांनी असा नशा करण्यापेक्षा आता चांगली कामे करावीत. आम्ही विधानसभेत उभं राहून म्हटलं होतं की, अनेकांनी आम्हाला त्रास दिला. या सगळ्या लोकांचा आम्ही बदला घेऊ. आम्ही त्यांना आधीच माफ केलं आहे. आमच्या मनात आता कोणतीही कटुता नाही.”

याबद्दल संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले,”त्यांच्याकडे कोणी माफ करा अशा मागण्या कोणी केल्या नव्हत्या. त्यांना माफ करायचं की नाही, हे आम्ही ठरवणार आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष, हिंदुत्ववादी पक्ष, केंद्रीय यंत्रणा आणि पैशांचा वापर करत तोडला हा महाराष्ट्रावर आघात आहे. महाराष्ट्रातली जनता ही वेदना विसरणार नाही, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले, “राज्याची जनताच आता ठरवेल त्यांना माफ करायचं की नाही मात्र महाराष्ट्रातील जनता ही वेदना विसरणार नाही. तुम्ही माफीचं वाटप करायला बसला आहात का? महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला घाव आहे. शिवसेना कधीही विसरणार नाही. भाजपकडून हात जरी आला तरी अजिबात स्वीकारल्या जाणार नाही. राजकारणात मतभेद होत असतात पण तुम्ही बाळासाहेबांनी निर्माण केलेला पक्ष फोडता, तोडता आणि चोर लफंग्यांच्या हातात ठेवता कोण तुम्हाला माफ करेल.