भाऊसाहेब भोईर यांच्या प्रचारार्थ भव्य दुचाकी रॅली

0
52

भव्य दुचाकी रॅलीतून भाऊसाहेब भोईर यांचा प्रचार

भाऊसाहेब भोईर यांच्या प्रचारार्थ भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भाऊसाहेब भोईर यांच्या मनीषा स्मृती निवासस्थानापासून दुचाकी रॅलीची सुरुवात झाली. त्यानंतर दुचाकी रॅली थेरगांव, रहाटणी, वाल्हेकरवाडी
काळेवाडी फाटा चौक, चाफेकर चौक, चिंचवड, वाकड, कस्पटेवस्ती वस्ती करत डांगे चौक या ठिकाणी रॅली सांगता करण्यात आली. याप्रसंगी चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर, मा. नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, गणेश लोंढे, राजाभाऊ गोलांडे, सिद्धिक शेख आणि शेकडो दुचाकीधारक उपस्थित होते.

निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ २ दिवस शिल्लक असल्याने या अंतिम टप्प्यात भाऊसाहेब भोईर यांच्याकडून प्रचार रॅली, सभा, मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहे. या दुचाकी रॅलीला  मोठा उत्साहपूर्ण प्रतिसाद पाहायला मिळाला. मतदारसंघातील नागरिकांचे असलेल्या प्रश्नांवर लक्ष वेधून घेण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने, स्वच्छतागृहांचा अभाव, पथदिव्यांचा अभाव, सुरक्षिततेचा प्रश्न, पाणी प्रश्न, सोसायटीपर्यंत विविध माध्यमातून शटल सेवा मिळावी यावर  रॅलीच्या माध्यमातून आवाज उठवला.

चिंचवड मतदारसंघात महिलांच्या सबलीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी, सुरक्षेसाठी कोणतेही ठोस काम करण्यात आलेले नाही. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे अक्षरश: दुर्लक्ष केले आहे.  विविध भागात स्वच्छतागृह उभारणे, महिला व मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिरांचे व विशेष प्रशिक्षण देणे ही महिलांच्या दृष्टीने महत्त्वाची कामे प्राधान्याने हाती घेणार असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी रॅलीच्या निमित्ताने सांगितले. ते पुढे म्हणाले की जनतेच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांने यंदाची निवडणूक मी लढवत आहे. चिंचवड मतदार संघातील जनता यावेळी चिंचवडचाच उमेदवार विधानसभेत पाठवते याची मला खात्री आहे.

अनंत कोऱ्हाळे म्हणाले की भाऊसाहेब भोईर हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पाच वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. २००९ ला विधानसभा आणि २०१४ ला लोकसभा निवडणूक लढलेल्या भाऊसाहेब भोईर यांच्याकडे निवडणुकीचा दांडगा अनुभव असून उच्चभ्रू तसेच तळागाळापर्यंत भाऊसाहेब भोईर यांचा थेट संपर्क असल्याने त्यांना यंदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्यांच्यासारखा सुशिक्षित आणि चारित्र्यवान उमेदवार चिंचवड मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी हवा आहे. त्यामुळेच मीही त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून निवडणुकीच्या आखाड्यात त्यांच्या मदतीसाठी उतरलो आहे. मला नक्की खात्री आहे चिंचवड मतदार संघातील नागरिक आम्हाला निराश करणार नाहीत.