भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला मारहाण

0
686

हिंजवडी, दि. ८ (पीसीबी) – हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेल्यानंतर हॉटेल मालकाला काहीजण मारहाण करत असल्याने तरुणाने ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यातून मारहाण करणाऱ्या टोळक्याने भांडण सोडवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 7) पाहते साडेतीन वाजता इको लॉन्ज हॉटेल, हिंजवडी येथे घडली.

शिवम राज सिंग (वय 24, रा. मामुर्डी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजित सदाशिव हाके (वय 26, रा. निगडी), आशिष जयसिंग आवारे (वय 28, रा. थेरगाव), राकेश शिंदे आणि इतर जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवम आणि त्यांचे मित्र हिंजवडी-वाकड रोडवर असलेल्या इको लॉन्ज हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेले होते. पार्टी सुरु असताना काहीजण हॉटेल मालकाला मारहाण करत असल्याचे शिवम यांना दिसले. त्यामुळे शिवम यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आरोपींनी शिवम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून काचेची बाटली, ग्लास आणि खुर्ची त्यांच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी शिवम यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.