भव्य आणि नेटक्या कार्यक्रमाच्या आयोजनाने भगिनी भारावल्या

0
33

पुणे, दि. १८ ऑगस्ट (पीसीबी) – राज्यस्तरीय भव्य आणि नेटक्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असल्याने आणि त्यापेक्षाही योजनेचा लाभ देणाऱ्या लाडक्या भावांची भेट होणार असल्याने कार्यक्रमाला आलेल्या महिला भगिनी अक्षरशः भारावून गेल्या.शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉल मध्ये मुख्य कार्यक्रमाच्या व्यासपीठावर या योजनेच्या लाभार्थी भगिनींना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात हा लाभ वितरण सोहळा दिमाखात संपन्न झाला.

मुख्य व्यासपीठासमोर रांगोळीत भव्य राखी साकारण्यात आली होती. मुख्य सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या हॉलमध्येही महिलांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त बैठक व्यवस्थेसाठी बॅडमिंटन हॉलच्या दोन्ही बाजूसही मोठे हँगर्स उभारण्यात आले. तसेच क्रीडा संकुल परिसरात इतर ठिकाणी उत्कृष्ट अशी बैठक व्यवस्था करण्यात आली. या सर्व महिलांशी थेट संवाद साधण्यासाठी हॉलच्या मध्यातून बनविण्यात आलेल्या उंच पदमार्गावरून जात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही बाजूच्या महिलांशी संवाद साधला. सर्व महिलांनी आपल्या मोबाईलचे दिवे सुरू करून त्यांचे स्वागत केले.

येणाऱ्या प्रत्येक महिलेची प्रवास आणि इतर व्यवस्था प्रशासनाने केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला येऊनही कुठेही गैरसोय झाली नाही.योजनेचे आकर्षक सेल्फी पॉइंटही प्रशासनाने प्रवेशद्वारांवर उभारले होते. क्रीडा संकुलाच्या एवढ्या मोठ्या भव्य परिसरात पहिल्यांदाच येण्याची संधी मिळालेल्या महिला उत्साहाने या सेल्फी पॉइंट तसेच ठिकठिकाणी असलेल्या बॅनर्ससमोर सेल्फी घेत होत्या.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली बहार
लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत आदींनी सादर केलेल्या एकाहून एक सरस गीतांनी कार्यक्रमात बहार आणली. उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात, आपल्या जागी उत्स्फूर्त नृत्य करत या गीतांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना दाद दिली.

सासुरवाशीणी आज खऱ्या अर्थाने आल्या माहेरी
यावेळी वैशाली सामंत यांनी कार्यक्रमाला आलेल्या सासुरवाशीणी आज खऱ्या अर्थाने आपल्या माहेरी आलेल्या माहेरवाशिणीसारख्या दिसत असल्याच्या अतिशय समर्पक शब्दात महिलांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. यावेळी वैशाली सामंत यांनी ‘गुलाबाची कली बघा हलदीनं माखली’,’गोजिरी’, ‘मेरा इंडिया’, ‘ऐका दाजीबा’, आदी सर्वांना भावणारी रंगतदार गीते सादर केली.

अवधूत गुप्ते यांनी ‘एक हजारो मे मेरी बेहना है’ या गाण्याने सुरुवात करताच उपस्थित महिला हळव्याही झालेल्या पाहायला मिळाल्या. मनमोराचा कसा पिसारा फुलला, पोरी जरा हळू हळू चाल, शिवबा राजं नाव गाजं जी आदी गुप्ते आणि बांदोडकर यांनी गणाधीशा मोरया, स्वप्नील बांदोडकर यांनी ‘जहा डाल डाल पर सोने की चिडिया’ यासह गायलेल्या ‘राधा ही बावरी’ या गीताला महिलांनी कोरसची साथ देत उत्स्फूर्त दाद दिली. मुग्धा कराडे यांनी आधुनिक रूपातील छबिदार छबी गीत सादर केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे रंगतदार सूत्रसंचालन टिव्ही कलाकार अभिजित खांडकेकर, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आदींनी खुसखुशीत शैलीत केले.

देखणे आणि नेटके आयोजन असलेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभही तेवढाच दिमाखदार झाला. सभागृहाच्या मध्यभागी येऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कळ दाबताच संपूर्ण सभागृह रंगीत पताकांची वृष्टी आणि आकर्षक आतिषबाजीने भरून गेले.मान्यवरांच्या स्वागताला महिला ढोल पथकाने केलेले सादरीकरण, प्रत्येक महिलेची आवर्जून भेट घेणारे मान्यवर मंत्रीगण, घरगुती सोहळ्याप्रमाणे महिलांचा सहभाग हीदेखील स्मरणात राहणारी क्षणचित्रे होती.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका, जिल्हा परिषद आदी विभागांनी अतिशय नेटके नियोजन केल्यामुळेच हा सोहळा दिमाखदार झाला.