भरधाव मोटारीच्या धडकेत महापालिकेतील सफाई कामगार महिलेचा मृत्यू

0
57

पुणे, दि. 23 (पीसीबी) : मोटारीच्या धडकेत पदपथावरील गवत काढणाऱ्या सफाई कामगार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंढवा-खराडी रस्त्यावर घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी मोटार चालकाला अटक केली.

राजेंद्र ज्ञानोबा धुमाळ (वय ५२, रा. रायकर मळा, धायरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे छाया मंगेश पेढारकर (वय ३९, रा. खराडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ज्योती लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी  सकाळी अकराच्या सुमारास मुंढवा पुलाकडून खराडी गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पेंढारकर या महापालिकेत कंत्राटी पदावर सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी त्या त्यांच्या सहकारी छाया यांच्यासह खराडीतील रस्त्यावर गवत काढण्याचे काम करत होत्या. त्या वेळी भरधाव मोटारीने छाया यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या छाया यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. पोलिसांनी मोटार चालक धुमाळ याला अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख तपास करत आहेत.